Mumbai Pune Expressway Traffic Jam latest news: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तो आज सकाळी त्या मुंबईहून पुण्याच्या दिशेनं एक्स्प्रेस वेवरून निघाल्या असतानाचा आहे. एकीकडे मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं आज लोकार्पण होत असताना या मार्गावरची वाहतूक कोंडी सुटेल असं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे मिसिंग लिंकच्या उद्घाटनाआधीच खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दृश्य दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिक या ट्रॅफिक जाममध्ये अडकले असून त्यात खासदार सुप्रिया सुळेंचाही समावेश आहे.

सुप्रिया सुळेंनी वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या असतानाचा व्हिडीओ

सुप्रिया सुळेंनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या असताना गाडीतूनच एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यातून त्यांनी घाटात खोळंबलेल्या गाड्यांची दृश्य दाखवली आहेत. शिवाय या व्हिडीओमध्ये त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या कारमधील चालकानंही आपली व्यथा मांडली आहे. “सकाळी ७ पासून ठाण्याहून निघालो आहे. पण गेल्या दोन तासांपासून घाटात ट्रॅफिक जाममध्ये अडकलोय”, असं ही व्यक्ती सांगताना दिसत आहे. “इथे वाहतूक कोंडीत गाडी उभी असताना गेल्या दीड-दोन तासांपासून आसपासच्या गाड्यांमधील लोकांशीही चांगली मैत्री झाली आहे”, अशी खोचक टिप्पणीही सुप्रिया सुळेंनी या व्हिडीओमध्ये केली आहे.

एकही गाडी जागची हलत नाहीये – सुप्रिया सुळे

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी एबीपीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये घाटात नेमकी काय स्थिती आहे? याबाबत भाष्य केलं आहे. “इथे सगळेच नागरिक दोन तासांपासून घाटात अडकले आहेत. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक अडकले आहेत. लाँग वीकेंड, किंवा कार्यक्रम असतील. पण सगळेच इथे ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. घाटातून मी खाली पाहिलं तर तिथे एकही गाडी जागची हलत नाहीये. व्हिडीओ म्हणून छान दृश्य घाटातून दिसतंय. पण नागरिकांची मोठी गैरसोय इथे होत आहे”, असं त्या म्हणाल्या.

वाहतूक कोंडीसाठी मिसिंग लिंक सोहळा कारणीभूत?

“या वाहतूक कोंडीसाठी मिसिंग लिंक कारणीभूत आहे की आणखी काय माहिती नाही. आम्हाला नेहमीची सवय आहे. घाटात रोजच ट्रॅफिक असतं. पण आज इथे सगळेच दोन तासांपासून अडकून पडले आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

घाटातील ट्रॅफिकबाबत सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी खंडाळा घाटातील नेहमीच्या ट्रॅफिक समस्येबाबत तोडगा काढण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस सरकारला केलं आहे. “माझी सरकारला विनंती आहे की इथल्या वाहतूक कोंडीचं काहीतरी करा. घाटात हवंतर पोलीस पाठवा. हा माझ्या एकटीचा विषय नसून हा इथे अडकलेल्या सर्वच नागरिकांचा विषय आहे. हा वाहतूक खोळंबा ही रोजचीच अडचण आहे. मिसिंग लिंकमुळे ही समस्या सुटली तर आनंदच होईल. पण आज घाटात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाड्या खोळंबलेल्या दिसत आहेत. हा फक्त सुट्ट्यांच्या काळातला मुद्दा नसून रोजचाच विषय आहे. हा घाट चढायला सुरुवात केली की कधी पूर्ण घाट उतरून जाऊ हे सांगता येत नाही. कधी २० मिनिटांत जातो तर कधी अगदी २ तासही लागतात. आमची एवढीच विनंती आहे की पोलीस यंत्रणेनं आज या वाहतूक खोळंब्यावर मार्ग काढावा”, असं त्या म्हणाल्या.