खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (१ जून) पहाटे झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

महामार्गावरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर ३६.५०० जवळ पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या खाद्यतेल वाहून नेणाऱ्या कंटेनरला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेच्या वेळी शेजारच्या मार्गिकेतून जात असलेल्या एर्टिगा कारलाही ट्रकची धडक बसली.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की तांदूळ भरलेला ट्रक आणि कंटेनर दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. मृतांची ओळख वृत्त लिहीपर्यंत पटलेली नव्हती. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (८०), मुकिंदा सस्ते (५६) आणि महेंद्र पाल (३९) यांचा समावेश आहे.

अपघातानंतर तांदळाच्या बॅगा आणि खाद्यतेल रस्त्यावर विखुरल्याने द्रुतगती मार्गावरील चारही मार्गिकांवरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकांनी तातडीने मदतकार्य राबवून अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावर पडलेला माल हटविला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.