अलिबाग- मुंबई पुणे दृतगती मार्गावर वाहतूक टँकर अपघातानंतर प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली. गळतीमुळे जवळपास ३२ तास महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवावी लागली. प्रॉपलीन गॅस नेमका कशासाठी वापरला जातो याची उत्सुकता वाढली आहे, आणि ही गॅस गळती रोखण्यास इतक उशीर का झाला याबाबतचे प्रश्न विचारले जात आहे. या संदर्भातील लोकसत्ताचा विशेष वृत्तांत.
प्रोपोलीन गॅस कशासाठी वापरला जातो ?
प्रोपोलीन गॅस हा प्रामुख्याने औद्योगिक कारणांसाठी वापरला जातो, हा अत्यंत ज्वलनशील असतो, गॅस गळती झाल्यास त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते, त्यामुळे या गॅसची वाहतुक आणि साठवण ही अत्यंत कडक सुरक्षेच्या नियमा अंतर्गत केली जाते. प्रॉपलीन गॅस हा प्लास्टीक उद्योग, पेट्रोलियम उद्योग काही प्रमाणात औषध आणि सौदर्य प्रसाधन उद्योगात वापरला जातो. रसायन उद्योगात प्रोपलिन वापरून प्रॉपलीन ऑक्साईड तयार केले जाते, ज्याचा वापर फोम, गाड्या आणि इन्सुलेशन कामांसाठी केला जातो. आईसोप्रोपाईल अल्कोहोल हे रसायन तयार केले जाते जे सॅनिटायझर, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या सफाईसाठी वापरले जाते.
झाले काय ?
अतिज्वलनशील असल्याने हा वायू वाहतुक करतांना खूप काळजी घ्यावी लागते. पण ही काळजी घेतली न गेल्याने मंगळवारी मुंबई पुणे दृतगी मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना घडली. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारा एम एच ०१ एजी ४२ क्रमांकाचा टँकर उलटला, अपघातामुळे टॅकरमधून गॅस गळती सुरु झाली. त्यामुळे महामार्गावरील मुंबई मार्गिकेवरील वाहतूक सुरक्षा कारणांसाठी रोखण्यात आली. जवळपास २४ तांसाहून अधिक काळ ही मार्गिका वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आली. गॅस गळतीमुळे स्फोट होऊ नये यासाठी टँकरवर सतत पाण्याचा मारा केला जात होता. अग्नीशामन दलाचे तीन बंब यासाठी तैनात ठेवण्यात आले होते.
गळती रोखण्यातील दिरंगाई कशामुळे?
बत्तीस ताांसाच्या प्रयत्नानंतर गॅस गळती थांबविण्यात यंत्रणांना यश आले. मात्र गळती रोखण्यात दिरंगाई का झाली याबाबतची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. अपघातामुळे टँकरला तीन ठिकाणी गळती लागली होती. मंगळवारी रात्री अंधारात गळती रोखणे शक्य झाले नाही, सकाळी यंत्रणांनी गळती रोखण्याचे काम सुरू केले. दोन ठिकाणची गळती रोखली, पण तिसरी गळती रोखणे शक्य होत नव्हते, शेवटी दुसरा टँकर आणून अपघात ग्रस्त टँकर रिकामा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टँकर बोलावून अपघातग्रस्त टँकर मधील प्रोपोलीन गॅस बाहेर काढण्यात आला. वाहतुक कोंडीमुळे रिकामे टँकर अपघात ग्रस्त टँकर पर्यंत पोहोचवणे कठीण जात होते. यापुढे असे अपघात होऊ नये आणि झाल्यास सक्षम यंत्रणा असावी यासाठी उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी जाहीर केले.
तज्ञ काय सांगतात ?
प्रोपोलीन हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे. त्यामुळे त्याची हातळणी करतांना खूप काळजी घ्यावी लागते. अपघातग्रस्त टँकरला थोडाही स्पार्क मिळाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, त्यामुळे प्रोपलिन गळती जेव्हा होते. गळती असलेला परिसर निर्मनुष्य ठेवणे आणि कुलिंग प्रोसेस सुरु ठेवणे आवश्यक असते. गरजेचे असते, ही कार्यप्रणाली प्रशासनाकडून अवलंबली गेली अशी माहिती आरसीएफ कंपनीचे अग्नीशमन आणि सुरक्षा विभागाचे मुख्य व्यवस्थापक सतीश हिरुगुडे यांनी दिली.
दुर्घटनेनंतर कोणती मागणी होतेय ?
भारतात सुरक्षेच्या मुद्दाकडे दुर्लक्ष केले जाते, रसायने आणि ज्वलनशील वायूंची वाहतूक करतांना काही नियम अथवा एस ओ पी घालून दिलेल्या असतात. ते पाळले जात नाहीत. खरेतर ज्वलनशील पदार्थ अथवा वायू वाहतुक करतांना परदेशात टँकरच्या मागे पायलट आणि तज्ञ पथक असणे अवश्यक असते. आपल्याकडे अशी खबरदारी कुठेच घेतली जात नाही. त्यामुळे जेव्हा असे अपघात होतात. संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली जाते. त्यामुळे प्रोपोलीन सारख्या घातक वायूंच्या वाहतुकीसाठी एसओपीचे काटेकोर पालन व्हायला हवे, तरच अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील आणि दर्घटना झालीच तर तात्काळ उपाययोजना करता येतील असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

