संदीप आचार्य

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मागील वर्षीही अशी स्थिती असल्याने करोनाच्या भितीपायी गंभीर आजार असणारे रूग्ण रूग्णालयात जाणे टाळत होते. परिणामी वेळीच आजाराचे निदान व उपचार न मिळाल्याने अनेकांचा आजार बळावल्याचे समोर आले होते. या परिस्थितीत अन्य आजाराने पीडित असणाऱ्या रूग्णांना नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी रूग्णालयात जाणे धोक्याचे वाटत असल्याने कोविड-१९ चाचणीसह आता इतर आजारांविषयी असलेल्या चाचण्या देखील घरच्या घरीच करून घेण्यावर सर्वसामान्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने घरच्या घरी करोना चाचणी (CoviSelf) करण्याची मुभा दिली आहे. त्यातच आता करोना संसर्गाच्या भितीमुळे अन्य आजारांनी पिडीत असणारे रूग्णही घराबाहेर न जाता या आजारांच्या चाचण्या घरीच करून घेण्यावर भर देत आहेत.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, स्नायुंमधील वेदना, पोट विकार आणि हृदयासंबंधी समस्या, श्वसन विकार तसेच मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग (यूटीआय) सारख्या अनेक गंभीर समस्येनं पीडित असणाऱ्या लोकांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हे लोक घराबाहेर जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे घरच्या घरीच आरोग्यविषयक चाचणी करून घेणाऱ्यांच्या संख्येत आता वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

संसर्ग टाळण्यासाठी घरीच चाचण्या!

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेचे कार्यकारी समिती सदस्या डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘‘कुठल्याही प्रकारचा आजार असो किंवा कोविड-१९ चाचण्या करण्यासाठी लोक पॅथॉलॉजी लॅबमध्ये येतात. यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दी वाढते. त्यातच अन्य आजारांनी पीडित असणाऱ्या रुग्णांना करोना संसर्गाचा धोका जास्त असतो. म्हणूनच करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक लोक घरीच विविध वैद्यकीय चाचण्या करून घेत आहेत. यात जास्त करून करोना चाचणी, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या चाचण्या घरी जाऊन केल्या जात आहेत. रक्तातील साखरेचं प्रमाण तपासण्यासाठी अनेक लोक ग्लुकोमीटरचा वापर करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

WHO च्या परीक्षेत भारतीय RTPCR Test ९५ टक्क्यांनी पास! ICMR नं केले निकाल जाहीर!

पुण्यातील अपोलो डायग्नोस्टिक्सचे सल्लागार पॅथॉलॉजिस्ट आणि झोनल टेक्निकल हेड वेस्ट डॉ. संजय इंगळे यांनी सांगितले की, ‘‘लॉकडाऊनदरम्यान मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदय आणि फुफ्फुसांच्या समस्या, युटीआय संसर्ग, सांधेदुखी, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. आधीपासून असलेले आजार किंवा नव्याने आजाराचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये करोना व्हायरस संसर्गाचा धोका अधिक जास्त असतो. अशा लोकांची आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी दर तीन महिन्यांनी नियमित चाचणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोविड सारखी लक्षणे दिसून येतात त्यांच्यासाठी देखील होम टेस्टिंग करणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेची तपासणी, वजन करणे, यूरिक एसिडची पातळी, हिमोग्राम, मूत्रपिंड, यकृत फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाइल, रुटीन युरीन, फॅटी लिव्हर, सोनोग्राफी, लठ्ठपणा यासारख्या विविध चाचण्या लोक करून घेत आहेत. जवळपास ५० टक्के लोकं घरच्या घरीच चाचणी करण्याला पसंती देत आहेत. यामध्ये लिपिड प्रोफाइल, एलएफटी, केएफटी, जीवनसत्त्वे आदींचा समावेश आहे.’’

शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले की, ‘‘सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नियमित आहारात फळे, भाज्या, शेंगदाणे, डाळी, तृणधान्य आणि सोयाबीनचा समावेश करावा. मदयपान आणि धुम्रपानाचे सेवन करू नये, हे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. शारीरिक हालचालींसाठी दररोज पहाटे व्यायाम करणे व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे योग्य ठरेल. प्रकृती ठीक नसल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. मोहन जोशी म्हणाले.