CM Devendra Fadnavis warning on Maharashtra heavy rain: मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारपासून पावसाची तीव्रता अधिक वाढली. शनिवारीही पावसाचा जोर कायम असल्यामुळे राज्य शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून शनिवारी आणि रविवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात मुसळधार पावसाबाबतची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, राज्यासह मुंबई महानगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे-नाशिक जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. कालपासून शासनाकडून लोकांना वेगवेगळे अलर्ट देण्यात आलेले आहेत. विशेषतः या भागात ६ तारखेपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस असेल. वादळही येऊ शकते, अशाप्रकारचे अलर्ट दिलेले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, काही भागात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होईल, अशी शक्यता आहे. राज्य शासनाकडून मुसळधार पाऊस असलेल्या भागांना दर तीन तासांनी एसएमएसद्वारे अलर्ट देत आहोत. नागरिकांनी हे अलर्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे. पावसामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी लोकांना प्रवास टाळण्याची विनंती केली आहे.

एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांनी शासनाचे अलर्ट पाहूनच शक्यतो घराबाहेर पडावे, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
कनेक्टिंग लिंकच्या खड्ड्यांबाबतही विधान
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टिंग केले आहे. तिथे दोन खड्डे आहेत. मात्र पूर्ण रस्त्यावर कुठेही खड्डे नाहीत. मात्र काही लोकांना यातच आनंद वाटत आहे. कुठलाही रस्ता बांधल्यानंतर पहिल्या पावसात त्याच्यावर खड्डे पडतात. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्यावर दुसरी लेअर टाकली जाते. विरोधकांनी टीका केली असली तरी आम्ही ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे मानतो.
राज ठाकरेंच्या पोस्टवर ‘मौन’
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला असल्याचे सांगून आमदार अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवर जोरदार टीका केली. या पोस्टबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. मात्र फडणवीस यांनी या प्रश्नावर उत्तर दिले नाही.

पावसाचा जोर अधिक कुठे?
राज्याच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवर ऑफ-शोअर ट्रफ म्हणजेच कमी दाबाचा लांब पट्टा तयार झाला असून तो संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील दोन दिवसात ते आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ४ ते ७ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
