सावंतवाडी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या दैनिक एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असला, तरी हा प्रवास अत्यंत वेळखाऊ होणार आहे. मुंबईतून सावंतवाडीला जाणाऱ्या अन्य दैनिक गाड्यांच्या तुलनेत या गाडीला सर्वाधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे या रेल्वेगाडी प्रवाश्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही रेल्वे गाडी मुबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. म्हणजेच या गाडीला ५१० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल १४ तास २० मिनिटे लागणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसपेक्षाही ही नवी गाडी दोन तास अधिक वेळ घेणार आहे. सध्या लागू असलेल्या पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई परिसरातून सावंतवाडी रोडकडे दररोज धावणाऱ्या प्रमुख गाड्यांच्या वेळांशी या नव्या गाडीच्या वेळेची तुलना केली तर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही सर्वात वेळ खाऊ गाडी ठरणार आहे.

तुतारी एक्सप्रेस मुंबईहून सावंतवाडीला १२ तास ४५ मिनटात पोहोचले. दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस १२ तास २० मिनटात पोहोचते. तर मांडवी एक्सप्रेस ११ तास ५० मिनटात पोहोचते. कोकणकन्या एक्स्प्रेस ९ तास ४४ मिनिटात सावतंवाडीत दाखल होते. जनशताब्दी एक्स्प्रेस ९ तास ३२ मिनिटात सावंतवाडीला येते. मंगळुरू एक्स्प्रेस ९ तास ८ मिनिटात सावंतवाडीला पोहोचते. त्यामुळे नव्याने सुरू होणारी मुंबई सावंतवाडी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सर्वात वेळ खाऊ गाडी ठरणार आहे. त्यामुळे या गाडीला कोकणवासीयांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.