Mumbai Train Chain Bomb Blasts Anniversary : ११ जुलै २००६ हा मुंबईच्या इतिहासातील सर्वांत काळा दिवस ठरला होता. कारण याच दिवशी मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्या भीषण संध्याकाळी हा बॉम्बस्फोट ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, त्या अनेकांना आजही त्या घटनेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम भोगावे लागत आहेत.
७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता
या स्फोटांमध्ये १८७ जणांचा मृत्यू झाला, तर ८१७ जण जखमी झाले. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात विशेष न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने म्हटलं की, सरकारी पक्षाला संशयाच्या पलीकडे जाऊन गुन्हा सिद्ध करता आला नाही. या आरोपींपैकी पाच जणांना फाशीची आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. निर्दोष मुक्तता होईपर्यंत त्यांनी जवळपास २० वर्षे तुरुंगात घालवली होती. कोविड-१९ महामारीदरम्यान एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाला होता. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
अनेक बचावलेल्यांसाठी या निर्दोष मुक्ततेने पुन्हा यातना झाल्या. स्फोटांसाठी नेमकं कोण जबाबदार होतं? याबाबतचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्याचबरोबर, कायमस्वरूपी अपंगत्वासह जगणाऱ्या अनेकांना दीर्घकालीन मदतीचा अभाव असल्याची खंत आहे. यानिमित्ताने इंडियन एक्स्प्रेसने पीडितांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
‘मी व्हीलचेअरने माझी ओळख ठरू देत नाही’
मालाड येथील सनदी लेखापाल, वकील आणि ‘सीए चौहान अँड कंपनी’चे संस्थापक ४० वर्षीय चिराग अरविंद चौहान यांच्यासाठी आयुष्य दोन वेगळ्या टप्प्यांत विभागलं गेलं आहे. “२० वर्षे मी सामान्य आयुष्य जगलो आणि गेली २० वर्षे व्हीलचेअरवर आहे. त्यामुळे मला वाटतं, मी जीवनाची दोन समान अर्धी आयुष्य जगलो आहे”, असं चौहान म्हणाले. २००६ मध्ये ते सीएचा अभ्यासक्रम करत होते आणि फोर्ट परिसरातील एका कंपनीत आर्टिकलशिप करत होते. ११ जुलैच्या संध्याकाळी घरी परतत असताना झालेल्या स्फोटाने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. या स्फोटात त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आणि छातीखालच्या शरीराचा सुमारे ८५ टक्के भाग कायमचा पक्षाघातग्रस्त झाला. ते सुमारे अडीच महिने रुग्णालयात होते. त्यानंतर त्यांनी फिजिओथेरपी सुरू केली. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारली आणि बराच वेळ आरामात बसता येण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली.
आई, तीन मोठ्या बहिणी, मित्र आणि सहकाऱ्यांनी त्यांना नव्याने उभं राहण्यास मदत केली. त्यांनी सीए पदवी पूर्ण केली, स्वतःची फर्म सुरू केली, एलएलबीचे शिक्षण घेतलं आणि हाताने नियंत्रित करता येणारी कार चालवायलाही शिकले. आजपर्यंत त्यांनी भारतभरात १.५ लाख किलोमीटरहून अधिक अंतर कारने प्रवास केला आहे.
“मी व्हीलचेअरने माझी ओळख ठरू देत नाही”, असं ते ठामपणे सांगतात. तरीही न्यायाचा प्रश्न त्यांना सतावत राहतो. “गेल्या वर्षी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आम्ही खूप अस्वस्थ झालो. अजूनही आपल्याला माहीत नाही की प्रत्यक्षात स्फोट कोणी घडवून आणले. कदाचित खरे आरोपी अजूनही मोकाट फिरत असतील”, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
‘एकदाच मदत नव्हे, दीर्घकालीन आधार हवा’
मीरा रोडचे रहिवासी आणि पश्चिम रेल्वेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले ५३ वर्षीय महेंद्र विलास पितळे यांनी या स्फोटात एक हात गमावला. आता ते कृत्रिम हाताचा वापर करतात. “प्रत्येक वर्षी ११ जुलै आला की त्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आम्हाला धक्का बसला. १९ वर्षे आम्ही वाट पाहिली की दोषींना शिक्षा होईल. पण तसं झालं नाही. आम्हाला न्याय मिळालाच नाही”, असं ते म्हणाले.
पितळे पूर्वी शिल्पकला आणि चित्रकलेचे काम करत होते. मात्र, हात गमावल्यामुळे त्यांचं ते करिअर कायमचं संपलं. त्यांच्या मते, पुनर्वसन ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. “एक चांगला कृत्रिम हात सुमारे १० लाख रुपयांचा असतो. त्यासाठी सरकारने कधीच आर्थिक मदत दिली नाही”, असं ते म्हणाले. स्फोटानंतर त्यांना नुकसानभरपाई आणि विम्याची रक्कम मिळाली. मात्र, कृत्रिम हातासाठी ती पुरेशी नव्हती. दर चार-पाच वर्षांनी हे कृत्रिम अवयव बदलावे लागतात. “प्रत्येक वेळी नव्या कृत्रिम हातासाठी स्वयंसेवी संस्था किंवा ट्रस्टवर अवलंबून राहायचं नाही. आमच्यासारख्या लोकांना एकदाच मदत नव्हे, तर आयुष्यभरासाठी पुनर्वसनाची गरज आहे”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘आमच्यापैकी कोणीही आता ट्रेनने प्रवास करत नाही’
कांदिवलीतील ४६ वर्षीय बिंदिया राणे यांच्यासाठी ११ जुलै हा दिवस केवळ वडिलांच्या स्मृती जपण्याचा दिवस आहे. त्यांचे वडील बलाम राणे हे स्फोटातून बचावले होते. मात्र, २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. “माझे वडील ४७ वर्षांचे होते. ते कामावरून घरी परतत होते. स्फोटात त्यांच्या कानाच्या पडद्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांची ऐकण्याची क्षमता कायमची कमी झाली. उर्वरित आयुष्यभर त्यांनी श्रवणयंत्राचा वापर केला”, बिंदिया सांगतात.
त्यांच्या उजव्या हातालाही दुखापत झाली होती. अनेक वर्षे त्यांना पावसाचा आवाज किंवा मोठ्या आवाजाचा त्रास होत होता. “स्फोट झाला तेव्हा वडील बेशुद्ध झाले होते. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना फक्त एवढंच आठवत होतं की, ते मृतदेहांवरून चालत बाहेर येत होते”, असं त्या सांगतात. नंतर डॉक्टरांना समजलं की, स्फोटादरम्यान त्यांना हृदयविकाराचाही झटका आला होता. कुटुंबावर त्याचा गंभीर आर्थिक परिणाम झाला.
“ते काही काळ काम करू शकले नाहीत. नंतर त्यांनी जवळच नोकरी स्वीकारली, कारण त्यांना पुन्हा ट्रेनने प्रवास करणं शक्य नव्हतं. त्या घटनेनंतर त्यांनी कधीच एकटे ट्रेनने प्रवास केला नाही. आमच्यापैकी कोणीही आता ट्रेनने प्रवास करत नाही”, असं त्या म्हणाल्या. त्यांच्यासाठी ११ जुलै हा वडिलांचा दुसरा वाढदिवस बनला होता.
“माझ्या वडिलांचे दोन वाढदिवस होते. एक त्यांचा खरा वाढदिवस आणि दुसरा ११ जुलै – ज्या दिवशी ते स्फोटातून वाचले. आम्ही दोन्ही दिवस साजरे करत असू, कारण आमच्या दृष्टीने ११ जुलै हा त्यांचा पुनर्जन्म होता”, असं बिंदिया यांनी सांगितलं.
