सावंतवाडी: कोकणातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले येथील महाविद्यालयांमध्ये लवकरच ‘अप्रेंटिस ओरिएंटल पदवी’ म्हणजेच शिकाऊ उमेदवारीवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त लखमराजे भोसले, प्राचार्य दिलीप भारमल आणि प्रा. गणेश मर्गज उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीचे शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करण्याचा आणि व्यावसायिक कौशल्यांचा अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमांनुसार दरमहा स्टायपेंड (विद्यावेतन) देखील दिले जाणार आहे. मुंबई आणि ठाणे येथील महाविद्यालयांमध्ये हा प्रयोग यापूर्वीच सुरू झाला असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा अभ्यासक्रम सुरू होत असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन व मत्स्य औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विपुल संधी मिळतील. पदवी अभ्यासक्रमाच्या सहा सेमिस्टरपैकी शेवटच्या वर्षात ६ महिने विद्यार्थ्यांना उद्योगाच्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करायचे आहे. तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार महाविद्यालयांना अभ्यासक्रमात स्वायत्तता देण्यात आल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.
स्वायत्त महाविद्यालयांबाबत पालकांनी शंका बाळगू नये:
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणींतर्गत महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या स्वायत्ततेबाबत विद्यार्थी व पालकांनी कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले. स्वायत्ततेमुळे शैक्षणिक नुकसान होत नसून उलट रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. पालकांमधील गैरसमज दूर करताना त्यांनी स्पष्ट केले की, स्वायत्त महाविद्यालये ही विद्यापीठाशी संलग्नच राहतात आणि अंतिम पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाचे नाव व लोगो कायम असतो. त्यामुळे पदवीची अधिकृतता व जागतिक मान्यता टिकून राहते.
स्वायत्त महाविद्यालयांना स्वतःचा अद्ययावत अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य असल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे शिक्षण मिळते, परीक्षा वेळेवर होऊन निकाल जलद लागतात. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना ‘अधिकारप्रदत्त स्वायत्त’ दर्जा देण्यात आला असून त्यावर विद्यापीठ व युजीसीचे नियंत्रण कायम असते, असे ते म्हणाले.
मुंबई विद्यापीठाने २०२४ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची १०० टक्के अंमलबजावणी केली आहे. कौशल्य आणि उद्योजकता प्रशिक्षण, अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,सावंतवाडी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू असून, वेंगुर्ले येथे सागरी संशोधन केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहितीही कुलगुरूंनी दिली.
