Mumbai vs Dubai Lifestyle experience : मुंबईत लहानाची मोठी झालेली आणि सध्या दुबईत राहणारी एक महिला जेव्हा पुन्हा मुंबईत आली, तेव्हा वाहतूक कोंडी (ट्रॅफिक) आणि वाढत्या महागाईमुळे हा बदल पाहून ती थक्क झाली. मुंबईत १५ दिवस राहून दुबईला परतण्यापूर्वी फराहने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने दोन्ही शहरांमधील दैनंदिन जीवनाची तुलना केली आहे.

फराहने सांगितलं की, दुबईला परतल्यानंतर तिला ‘कल्चरल शॉक’ बसेल अशी तिची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही शहरांमध्ये काही साम्य असले तरी तिला अनेक मोठे फरक प्रकर्षाने जाणवले. तिच्या मते, सुरुवातीला मुंबई आणि दुबई सारखीच वाटू शकतात, कारण दोन्ही शहरांमध्ये उंचच उंच इमारती, मेट्रोचे जाळे आणि वेगवान शहरी जीवनशैली पाहायला मिळते.

“दुबई शांतता देते, पण मुंबई बॅकग्राउंड म्युझिक देते”

तिच्या निरीक्षणात वाहतूक हा सर्वात मोठा फरक होता. ती म्हणाली, “सर्वात मोठा फरक अर्थातच ट्रॅफिकचा आहे. लोक याची तुलना करण्याचा प्रयत्न करतात, पण दुबईतील ट्रॅफिकमध्ये गाड्या धावतात, लोक थांबतात आणि कोणालाही ‘फास्ट अँड फ्युरियस’ चित्रपटासाठी ऑडिशन देण्याची गरज पडत नाही. याउलट, मुंबईत एका सिग्नलवर ४७ गाड्या असतात आणि प्रत्येकाच्या हॉर्नचा स्वतःचा एक वेगळा अजेंडा असतो. त्यामुळे हो, दुबई तुम्हाला शांतता देते, तर मुंबई तुम्हाला बॅकग्राउंड म्युझिक (पार्श्वसंगीत) देते.”

महागाईत मोठी वाढ

वाहतुकीव्यतिरिक्त, मुंबईतील वाढती महागाई हा फराहला जाणवलेला दुसरा सर्वात मोठा बदल होता. “विनोद बाजूला ठेवला, तर या वेळी मुंबईत मला जाणवलेली मुख्य गोष्ट म्हणजे तिथली महागाई. होय, हे शहर पूर्वीपेक्षा खूपच महाग झालं आहे, पूर्वी आपण मुंबई परवडणारी आहे असे म्हणायचो”, असं तिने नमूद केले. मुंबईत ती स्वतःचे घर असल्याने भाडे देत नाही, त्यामुळे भाड्याबद्दल ती जास्त बोलू शकली नाही, पण दैनंदिन फिरणे आणि खर्च खूप महाग झाल्याचे तिने सांगितलं.

फराहने पुढे सल्ला दिला की, जे लोक दुबईत चांगल्या पगार पॅकेजवर काम करत आहेत, त्यांनी तिथंच राहावं. कारण तिच्या मते, मुंबईत खर्चाच्या तुलनेत पगारात त्या वेगाने वाढ झालेली नाही. “त्यामुळे, जर तुम्ही दुबईत चांगल्या पगारावर असाल, तर तिथेच टिकून राहा,” असं ती म्हणाली. पुढे बोलताना ती म्हणाली, “याशिवाय, जर तुम्ही मुंबईला मिस करत असाल, मी देखील मुंबईला मिस केले होते, पण दुबईत परत आल्यावर कमी हॉर्नचा आवाज, गुळगुळीत रस्ते आणि थोडी आर्थिक स्थिरता अनुभवताना कोणतीही तक्रार नाही.

मुंबई महागल्याच्या मताशी नेटकरी सहमत

तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आणि अनेक युजर्सनी मुंबईतील वाढत्या खर्चाबाबत तिच्या निरीक्षणांना दुजोरा दिला. एका युझरने लिहिलं, “पूर्णपणे खरं आहे.. मलाही गेल्या आठवड्यात असाच अनुभव आला.. दैनंदिन गरजांच्या गोष्टींमध्ये मुंबई खूप महाग झाली आहे.” दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं, “मुंबईत पगारही वाढले आहेत… पण त्या प्रमाणात राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे, जे झालेले नाही.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “दुबईची तुलना मुंबईशी केली तर दुबई महाग आहे, पण कोविडनंतर मुंबईत प्रवास, भाडे, अन्न आणि दैनंदिन खर्च खूप वाढला आहे.” दरम्यान, एका युझरने अशी प्रतिक्रिया दिली की, “मुंबईत चांगली जीवनशैली जगणं नेहमीच महाग राहिले आहे.”