राज्यातील उद्धव ठाकरे सरकरचा पहिलाच अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला. या अर्थसंकल्पावर भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून सत्तेत येण्यापूर्वी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाला १० पैकी केवळ १ गुण त्यांनी दिला.

मुनगंटीवार म्हणाले, “राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षातही सरकारने तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बेरोजगार तरुणांसाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे. सरकारमध्ये येण्यापूर्वी तिन्ही पक्षांनी जाहीर केलेला स्वतःचा शपथनामा आणि वचननाम्याचा त्यांना विसर पडला आहे. यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे या सरकारला मी १० पैकी १ गुण देईन.”

“जनतेच्या समस्यांचा आणि मागण्यांचा सरकारने अवमान केला आहे. पर्यटन, तीर्थक्षेत्र योजना भाजपाच्याच आहेत. जलयुक्त शिवार योजनेचं नाव का बदलण्यात आलं?, अर्थसंकल्पातील एका पानावर तरी तुम्ही लोकांना दिलेला शपथनामा पूर्ण केला का? असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

अर्थसंकल्पातील चार घोषणांबाबत समाधान

दरम्यान, या अर्थसंकल्पातील चार घोषणांबाबत मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केलं आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना ५० हजार रुपयांची मदत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये रस्ते चांगले करावेत यासाठी एक हजार कोटींची तरतूद, आमदार निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय तसेच बचत गटांच्या सक्षमीकरणाबाबत घेतलेला निर्णय या घोषणांचा यात समावेश आहे.