अहिल्यानगर : शहरातील प्रमुख रस्त्यांवर बंद असलेल्या वाहतूक नियंत्रण दिव्यांच्या (सिग्नल) ठिकाणी महापालिका आता नवीन वाहतूक नियंत्रक दिव्यांची उभारणी करणार आहे. यासाठी महापालिकेकडून ८८ लाख ७९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. येत्या सहा महिन्यात हे वाहतूक नियंत्रक दिवे उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
शहरातील नागापूर चौक, प्रेमदान चौक, पत्रकार चौक व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौक या ठिकाणी हे नवीन वाहतूक नियंत्रक दिवे बसवले जाणार आहेत. शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे वगळता इतर सर्वच ठिकाणची व्यवस्था गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेली आहे. यात प्रामुख्याने शहरातून जाणाऱ्या मनमाड महामार्गावरील नागापूर चौक, प्रेमदान चौक व पत्रकार चौक तसेच छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील जीपीओ चौक, चांदनी चौक, बाजार समिती चौक, जुने बसस्थानक चौक, सकर चौक, कायनेटिक चौक आदी ठिकाणचे वाहतूक नियंत्रक दिवे बंदच आहेत.
शहरात उड्डाणपूल उभारल्यानंतर त्याखालील चौकात असलेले वाहतूक नियंत्रक दिवे पुन्हा सुरू झालेले नाहीत. वाढती रहदारी व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता नागापूर चौक, प्रेमदान चौक व पत्रकार चौक येथे नव्याने व्यवस्था उभारली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात सध्या वाहतूक नियंत्रक दिवे सुरू असले तरी ते वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे तेथे महापालिका नव्याने व्यवस्था उभाणार आहे. शहर विस्तारत असताना सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता या भागातील चौकांतही वाहतूक नियंत्रण दिव्यांची आवश्यकता भासत आहे.
शहरातील वाहतूक नियंत्रक दिव्यांची व्यवस्था हा एक जटिल प्रश्न झाला आहे. चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे असतात, मात्र तेथे पोलीस उपस्थित नसल्याने सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होते. याशिवाय गेल्या वर्षभरापासून शहराच्या विविध भागांमध्ये रस्ते तयार करण्याची मोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिमेंटकाँक्रीटचे रस्ते उभारले जात आहेत. मात्र हे काम रेंगाळले आहे. अनेक ठिकाणी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्याचाही परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. राज्य सरकारने शहरांअंतर्गत मंजूर केलेल्या रस्ते विकासाच्या कार्यक्रमातील पुढील हप्त्याचा निधी मिळण्यात दिरंगाई झाल्याने कामांवर परिणाम झाला आहे.
शहरातील प्रमुख सक्कर चौक ते बाजार समिती चौक यादरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होत असते. तेथे वाहतूक पोलीस उपस्थित ठेवण्याची नागरिकांची मागणी आहे.
