नाशिक-पुणे प्रत्येकी ४ लाख, सोलापूर २ लाख, नागपूर १ लाख, ठाणे ९५ हजार तर मुंबईत १५ हजार वसूल

राज्यात प्लास्टिक बंदी लागू होताच विविध शहरांतील महापालिकांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे ११ लाख रुपये इतका दंड वसूल झाला. सामान्य माणसांवर कारवाई न करण्याचा आदेश पर्यावरणमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जात असले, तरी पहिल्याच दिवशी प्लास्टिक बाळगणाऱ्या सर्वसामान्य माणसांनाही पाच हजार रुपयांची दंडाची पावती फाडावी लागली.

पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूरमध्ये लाखांच्या घरात दंडवसूली झाली.  ठाण्यात ९५ हजार तर मुंबईत १५ हजार रुपये दंड वसूल झाला. बंदीमुळे मुंबईतला हॉटेल व्यवसाय २० टक्क्य़ांनी घसरला असून राज्याच्या अनेक भागांत पालिका अधिकारी आणि व्यापाऱ्यांत शाब्दिक खडाजंगी झाली. सोलापुरात पोलिसांना पाचारण करावे लागले. अनेक दुकानदारांनी दुकानेच बंद ठेवली.

प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेने सीलेरीया, स्टार बक्स, मॅकडोनाल्ड आणि फूड हॉल अशा चार ठिकाणी कारवाई केली. यापैकी मॅकडोनाल्डने दंड भरला नसून इतर तिघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मॅकडोनाल्डवर खटला भरण्यात येईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

पहिल्या दिवशी प्लास्टिक वापराबाबत विक्रेते आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. काही ठिकाणी मात्र खुलेआम प्लास्टिक पिशव्यांमधून सामान ग्राहकांना दिले जात होते. कारवाईच्या भीतीने किंवा बंदीला समर्थन म्हणून ग्राहकांनी कापडी पिशवी आणि डबे घरून आणले होते. पण त्यांची संख्या किरकोळ होती. वापर, कारवाईबाबत संभ्रमावस्थेत असलेल्या काही दुकानदारांनी तर दुकानेच बंद ठेवली होती. शनिवारी मासे विक्री कमी होते, पण रविवारी मासे विक्री घसरेल काय, या विचाराने मासे तसेच मटणाचे विक्रेतेही धास्तावले आहेत.

किराणा माल, मिठाईच्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांची जागा कागदी पुडय़ांनी घेतली होती. त्यातूनच धान्य, अन्य वस्तू, मिठाई, फरसाण, चिवडा, वेफर बांधून दिले जात होते. अनेक ग्राहक भाजीपासून कोंबडीच्या मांसापर्यंतच्या वस्तू कागदी पुडयांमधून आणताना दिसले. काही ठिकाणी मात्र सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत होता. दूध, दही, पनीर विकणाऱ्या दुग्धालयांमध्येही हेच चित्र होते.

पातळ पिशव्यांना बंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण जाड किंवा मोठया पिशव्यांचा वापर अंगवळणी पडला आहे. मोठया, जाड पिशव्या घरातली गरजेची, आवश्यक वस्तू बनली आहे. शिवाय त्यांचा पुनर्वावापर हातो, त्यामुळे त्यांच्यावरील बंदी हटवावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. ऐन पावसाळ्यात ही बंदी लागू झाल्याने भिजणाऱ्या पिशव्यांतून नित्याच्या वस्तू आणि खरेदी केलेल्या गोष्टी कशा न्यायच्या, असा प्रश्नही अनेकांना पडला.

हॉटेलव्यवसाय घसरला

बंदीच्या पहिल्याच दिवशी मुंबईतला हॉटेलव्यवसाय १५ ते २० टक्क्यांनी घसरला. रसभाजी, ओल्या चटण्या, सांबार, डाळ यांचे पार्सल कशातून द्यावे, याबाबतचा संभ्रमामुळे हॉटेलव्यावसायिकांनी ग्राहकांना माघारी पाठवले.

ठाण्यात ९५  हजाराचा दंड

ठाणे महापालिकेच्या कारवाईत सुमारे २५०० किलो प्लास्टिक हस्तगत झाले असून अंदाजे ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला. महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये तसेच फिरत्या वाहनाच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

पुण्याची आघाडी!

बंदीच्या पहिल्याच दिवशी पुणे शहरातून ३ लाख ६९ हजार शंभर रुपये दंड  वसूल करण्यात आला. दिवसभराच्या कारवाईत आठ हजार ७११ किलो प्लास्टिक आणि ७५ किलो थर्माकोल जप्त करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात पंचवीस पथकांकडून पाच  हजाराच्या तब्बल ७३ पावत्या फाडण्यात आल्या.

नाशिकमध्ये धडाका

नाशिकमध्ये ७२ जणांविरोधात दंडात्मक कारवाई करत तीन लाख ६० हजार रुपयांची दंड वसुली केली गेली. या कारवाईत सुमारे ३५० किलो प्लास्टिक हस्तगत करण्यात आले.

व्यापाऱ्यांकडून हुज्जत

बंदीची कारवाई सुरू असताना सोलापूर महापालिकेच्या पथकांबरोबर व्यापाऱ्यांनी वाद घातल्याचे प्रकार घडले. दुपापर्यंत शहरात प्लास्टिक वापराबद्दल एकूण ४३ व्यापाऱ्यांविरुद्ध दोन लाख १५ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नदी, नाल्यात प्लास्टिक

नागपूर महापालिका पथकांनी प्लास्टिक विक्रेत्यावर छापे टाकून १ लाख ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. खामला परिसरातील एका विक्रेत्याने कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला धमकावले. त्यामुळे  त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अनेकांनी नदी, नाल्यात प्लास्टिक फेकून दिल्याचे आढळले.

तीन तासांत १०० किलो!

देशातील सर्वाधिक दहा प्रदूषित शहरांच्या यादीत नाव असलेल्या चंद्रपुरात प्लास्टिक प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे महापालिकेने धडक मोहीम राबवून १०० किलोंवर प्लास्टिक पिशव्या आणि साहित्य जप्त केले.

पोलिसांना पाचारण

अमरावतीत सायंकाळी ६ वाजेपर्यंत १०० किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल असे साहित्य दुकानदारांकडून हस्तगत करण्यात आले. प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या दुकानदारांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, चित्रा चौक परिसरातील दुकानदारांनी कारवाईला विरोध केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करावे लागले.

फ्लेक्स कधी रोखणार?

’फ्लेक्सही बंदीच्या कक्षेत आहे, पण सर्वच राजकीय पक्षांचे फलेक्स राज्यात चौकाचौकात झळकत असतात. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईबाबत सोयीस्कर मौन बाळगले जात आहे.

’हीच बाब पुण्यातील नागरिकांनी शनिवारी समाजमाध्यमांवर आणली आणि शेकडो फ्लेक्स बंदी मोडून झळकत असल्याची चित्रे टाकली. तेव्हा या फ्लेक्सवर सोमवारपासून कारवाई सुरू करणार असल्याची घोषणा पालिकेला करावी लागली.

नेत्यांच्या उपस्थितीतच बंदी मोडली!

नांदेड : प्लास्टिक बंदी लागू असताना पहिल्याच दिवशी नांदेडमध्ये एका राजकीय नेत्याकडील विवाह सोहळय़ात या बंदीचे उल्लंघन झाले. या सोहळय़ाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर होते. विवाह सोहळय़ाच्या भोजनप्रसंगी प्लास्टिकच्या वाटय़ा, ग्लास मोठय़ा प्रमाणावर वापरण्यात आले.