राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. यामुळे नगरपालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार आहेत. त्याचबरोबर नगरपालिकेतील नगराध्यक्ष हा थेट लोकांमधून निवडून देण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणुकीच्या गणितांवर परिणाम होणार आहे.
नगराध्यक्ष थेट नागरिकांमधून निवडून दिला जावा, अशी मागणी होती. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीवेळी मतदारांना नगरसेवक निवडण्याबरोबरच नगराध्यक्षही निवडावा लागणार आहे. यासंबंधीचा अध्यादेश लवकरच राज्य सरकारकडून काढण्यात येणार असून, त्यानंतरच याची अंमलबजावणी होणार आहे. येत्या काळात राज्यात २१५ नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्या सर्व याच पद्धतीने होणार आहेत.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, पुणे अशा १० महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याची निवडणूक कशी होणार, याबद्दल या शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.