अलिबाग– मुंबई पुणे रेल्वे मार्गावर ठाकूरवाडी गावाजवळ सुटकेस मध्ये आढळलेल्या मृत महिलेच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी आरोपीला कर्नाटक मधील बँगलोर येथून अटक करण्यात आली आहे.
१६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी दहा वाजता मुंबई पुणे रेल्वे मार्गावर ठाकूरवाडी स्टेशन जवळ एक गुलाबी रंगाची ट्रॅव्हलहब नावाची एक टॉली असलेले सुटकेस आढळून आली होती. या सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. महिलेचा खून करून तिचा मृतदेह हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधण्यात आले होते. तर चेहरा प्लास्टीकच्या पिशवीने बांधण्यात आला होता. या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांना दिले होते. त्यानुसार कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांना एकत्र करून तपास पथके तयार करण्यात आली होती. बॅग सापडलेल्या ठिकाणी कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने तपास करणे आव्हानात्मक होते. त्यामुळे सुरवातीला पोलीसांनी मुंबई, रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, कर्जत आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील रेल्वे स्थानकांवरील दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. या तपासणी दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक संशयित इसम गुलाबी रंगाची ट्रॉली असलेली सुटकेस बळाचा वापर करुन खेचत असल्याचे आढळून आला. हा व्यक्ती प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरुन १५ एप्रिल रोजी रात्री दहा वाजून १७ मिनटांनी सुटणाऱ्या मुंबई कोईंबतुर एक्सप्रेसच्या वातानुकूलीत बोगीत शिरतांना दिसला. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली.
पोलीसांनी या बोगीतील सर्व ५२ प्रवाश्यांच्या आरक्षणाची माहिती संकलित केली. त्यांचे मोबाईल क्रमांक शोधून त्यांची सिडीआर तपासले. तेव्हा दोन संशयित प्रवाश्यांनी कोईंबतुर पर्यंत तिकीट काढून बॅगलोर पर्यंतच प्रवास केल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. नेरळ पोलीसांनी बँगलोर रेल्वे स्थानकात जाऊन सीसीटीव्हीची तपासणी केली. तेव्हा दोघेही रेल्वेतून तिथे उतरतांना दिसले मात्र गुलाबी रंगाची ट्रॉली बॅग त्यांच्या जवळ नव्हती. त्यामुळे हेच आरोपी असल्याचा संशय बळावला.
तांत्रिक तपास करुन पोलीसांनी आरोपींच्या वास्तव्याची माहिती संकलित केली. त्यानंतर बँगलोर येथून त्यांना ताब्यात घेतले. व्ही विजयकुमार व्यंकटेश वय ३६ रा. कोडीगुत्ता आंध्रप्रदेश आणि टी. यशस्वीनी राजा ताटीकोलु वय २४ रा. तिरीपती आंध्रप्रदेश अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी हाम्मप्पापुरम रापताडू येथे राहणाऱ्या धनलक्ष्मी यारप्पा रेड्डी वय ३४ या महिलेची अंतर्गत वादातून हत्या केल्याची कबूली दिली. आणि मृतदेह रेल्वेतून ठाकूरवाडी येथे ठाकल्याची कबूली दिली आहे.
दोघांनाही कर्जत न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, प्रभारी अधिकारी नेरळ पोलीस ठाणे, तसेच नेरळ पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, कर्जत पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी मदत घेतली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत.