दोन वर्षांपूर्वी ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन दिनकर पवार, यांचा रविवारी मृत्यू झाल्यानंतर शिरोली पोलिसांनी रात्री खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८४ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विधिज्ञांचा सल्ला घेऊन यासंदर्भातील पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.बी.पाटील यांनी दिली.यापूर्वी शेट्टी, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांचेवर पवार यांचेवरील हल्ल्यासंदर्भात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोव्हेंबर २०१२ मध्ये जोरदार आंदोलन केले होते. १२ नोव्हेंबर रोजी आंदोलनाला िहसक वळण लागले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली फाटा येथे आंदोलनकत्रे व पोलीसांत झटापट झाली होती. आंदोलकांनी केलेल्या हल्यात मोहन पवार यांच्यासह चौघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यावर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शेट्टी, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांचेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये शेट्टी हे ७८ क्रमांकाचे आरोपी होते. मात्र या गुन्हयाबाबत आतापर्यंत पोलिसांकडून कसलीही उल्लेखनीय कारवाई झाली नव्हती. रविवारी मोहन पवार यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील गुन्ह्य़ाचे स्वरूप आता बदलण्यात आले आहे.
मोहन पवार यांच्या खुनाचा प्रयत्न ऐवजी खून (भादवि कलम ३०२) असा गुन्हा शेट्टी यांच्यासह उर्वरित आरोपींवर दाखल केला जाणार आहे. घटना घडली तेव्हा पवार यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते, परंतु आंदोलकांनी ते काढून डोक्यात लोखंडी सळईने प्रहार केले असल्याचे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते.   दरम्यान, राजू शेट्टी यांनी मोहन पवार यांचा मृत्यूचा प्रकार दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा आंदोलकांचा अजिबात विचार नव्हता. तसे असते तर स्वाभिमानीच्यावतीने मोहन पवार यांची इस्पितळात भेट घेऊन वैद्यकीय उपचाराकरिता ५० हजाराची मदत केली नसती. पवार यांच्या खुनाचा गुन्हा दाखल असला तरी तपासातून वस्तुस्थिती उघडकीस येईल, असेही शेट्टी म्हणाले.