ज्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली वडिलांना आणि भावाला पोलिसांनी तुरुंगात डांबले होते, तीच मुलगी अचानक जिवंत पोलीस ठाण्यात हजर झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर चूक झाल्याची कबुली गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच संबंधित तपास अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
विधानसभेत आमदार रोहित पवार यांनी या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी पोलिसांच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.
‘त्या’ पोलिसांवर थेट गुन्हे दाखल होणार; फडणवीसांची घोषणा
“या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या संबंधित पोलीस निरीक्षकांसह, उपनिरीक्षक आणि तपासात सामील असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. केवळ निलंबनच नाही, तर या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३ महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश
“निलंबन ही केवळ प्राथमिक कारवाई आहे. ज्या अधिकाऱ्यांचा या छळाशी थेट संबंध असल्याचे सिद्ध होईल, त्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले जाईल. या प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, पीडित कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
नेमकं काय घडलं होतं? (घटनाक्रम)
हे संपूर्ण प्रकरण एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असे आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार येथील २६ वर्षीय शिवानी काळमेकर ही तरुणी एप्रिल महिन्यात अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्याच वेळी, शिवानी ज्याच्यासोबत गेली असा संशय होता, तो २४ वर्षीय तरुण अरुण दादू काळमेकर हा देखील बेपत्ता झाल्याची नोंद झाली.
धक्कादायक वळण आणि पोलिसांची घाई
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील राजूरा धरणाजवळ एक मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे शीर धडावेगळे केलेले होते आणि तो अंशतः जळालेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा डीएनए चाचणी न करताच तो मृतदेह शिवानीचाच असल्याचा अंदाज बांधला होता. या संशयावरून पोलिसांनी शिवानीचे वडील बापूराव काळमेकर आणि भाऊ अजय यांना ताब्यात घेतले होते.
‘आम्हाला जंगलात नेऊन बेदम मारलं…’ पीडित कुटुंबाचा गंभीर आरोप
पोलिसांच्या दाव्यानुसार, चौकशी दरम्यान वडील आणि मुलाने शिवानीची हत्या केल्याची कबुली दिली होती. या कथित कबुलीनाम्याच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. परंतु, २८ मे रोजी या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला. मध्य प्रदेशच्या खकनार पोलिसांनी जळगाव जामोद पोलिसांना माहिती दिली की, शिवानी जिवंत आहे आणि तिचा शोध लागला आहे. शिवानीने स्वतः जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवला.
“मी जिवंत आहे, मला काहीही झालेले नाही. माझ्या वडिलांना आणि भावाला तात्काळ सोडून द्या!” असं शिवानीने पोलिसांना सांगितलं. तपासात समोर आलं की, शिवानी आणि अरुण हे दोघे नाशिकजवळ राहत होते, जिथे अरुण मजुरीचे काम करत होता.
५ लाखांची लाच आणि पोलिसांची मारहाण
तुरुंगातून सुटल्यानंतर बापूराव आणि अजय यांनी पोलिसांचा क्रूर चेहरा समोर आणला. त्यांनी एक व्हिडिओ जारी करत आरोप केला की, “पोलिसांनी आम्हाला बळजबरीने जंगलात नेले. तिथे काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि आम्ही न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी दबाव आणला. इतकेच नाही तर या प्रकरणातून सुटका करण्यासाठी पोलिसांनी ५ लाख रुपयांची लाचही मागितली होती.”
या गंभीर आरोपानंतर आणि जनतेतून उमटलेल्या तीव्र संतापानंतर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कारवाईची घोषणा केली आहे.
‘तो’ मृतदेह कोणाचा? राजूरा धरणातील ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य अद्याप कायम!
पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पोलिसांसमोर आता एक नवीन आणि मोठे आव्हान उभे राहिले आहे. राजूरा धरणाजवळ सापडलेला तो छिन्नविच्छिन्न मृतदेह नक्की कोणाचा होता? त्या महिलेची हत्या कोणी आणि का केली? हे रहस्य अद्याप कायम असून पोलीस आता या नव्या दिशेने तपास करत आहेत.
