आंतरजातीय विवाहाला असलेल्या विरोधामुळे लग्नानंतर तेवीस दिवसांत तरुणीची पालकांकडून हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण नेवासे तालुक्यात उघडकीस आले आहे.
कौठा (ता.नेवासे) येथील प्रतिभा ब्रह्मदेव मरकड असे मृत तरुणीचे नाव असून या तरुणीचा खून करून तिच्या आई वडिलांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली तसेच तिचा मृत्यू आजाराने झाला असल्याचे भासविले, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. सोनई पोलीस ठाण्यात या प्रकरणी मृत तरुणीचा पती देवेंद्र प्रकाश कोठावळे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ब्रह्मदेव रभाजी मरकड व आशा ब्रह्मदेव मरकड यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ऑनर किलिंगच्या या प्रकारची फिर्याद तब्बल १५ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी पुराव्याअभावी मृत मुलीच्या आई वडिलांना अटक केली नव्हती. घटनेनंतर ते फरार झाले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून प्रतिभा हिचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी असलेल्या पाच जणांचे जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले आहेत.
संगमनेर येथील देवेंद्र कोठावळे हे एका औषध कंपनीत नोकरी करतात. त्यांचे श्रीरामपूर शहरातील एका औषध विक्रीच्या दुकानात काम करणाऱ्या प्रतिभा ब्रह्मदेव मरकड हिच्यावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याला प्रतिभाच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. १ एप्रिल रोजी देवेंद्र व प्रतिभा यांनी विवाह केला. प्रतिभा ही संगमनेर येथे देवेंद्र यांच्या घरी राहू लागली. प्रतिभाने लग्न केल्याची माहिती घरी दिली. पण आई-वडिलांनी तिच्या आई-वडिलांनी या प्रकारावर राग व्यक्त केला.
काही दिवसांनी माहेरी आलेल्या प्रतिभाशी संपर्क होत नसल्याने तिच्या पतीने कौठा येथे येऊन प्रतिभाच्या घरी चौकशी केली. तेव्हा त्याला प्रतिभा हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले. यावेळी प्रतिभाच्या घरालगतच तिचा मृतदेह जळत होता. त्याने प्रतिभाच्या आई-वडिलांना प्रश्न विचारले असता दमबाजी करण्यात आली. त्यानंतर सोनई पोलीस ठाण्यात येऊन देवेंद्र यांची फिर्याद नोंदविली. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिभा हिचे आई-वडील हे फरार झाले.
कौठा येथील तरुणीच्या मृत्यूची घटना हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे. तिचा खून आई-वडिलांनीच केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही मिळाले आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. – रोहिदास पवार, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर
२२ दिवसांतच संसार विस्कटला
प्रतिभा हिने औषध निर्माण शास्त्रात पदवी घेतलेली होती. देवेंद्र व प्रतिभा यांचा संसार अवघा २२ दिवसच झाला. सुखी संसाराला केवळ जातीच्या भेदाभेदाची झळ बसली. अन् संसार विस्कटला गेला. गेल्या १५ दिवसांपासून पती देवेंद्र हा न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे.