scorecardresearch

हिंगोलीत मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली.

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. शुभम राजे (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी (१९ एप्रिल) पहाटे गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना ताब्यात घेतले. या घटनेत शुभम राजे यांच्या आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात बबलू धाबे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील तलाव पट्टा भागात शुभम राजे (२३) व बबलू धाबे यांच्यामध्ये काही दिवसापूर्वी मुलीच्या  छेडछाडीवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, हा वाद काहींच्या मध्यस्थीने लगेचच मिटला. सोमवारी (१८ एप्रिल) या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे व त्याच्यासोबत अन्य दोघे जण रात्री साडेनऊ ते १० वाजण्याच्या सुमारास तलाबकट्टा परिसरात आले. यावेळी त्यांनी शुभमला बोलावून घेत त्याच्यावर गुप्ती, खंजीर लोखंडी पाईपने सपासप वार केले.

हत्येनंतर हिंगोलीत एकच खळबळ, अफवांचे पेव फुटले

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला. त्यानंतर ते तिघेही फरार झाले. या घटनेमुळे शहरात रात्री एकच खळबळ उडाली. तसेच अफवांचे पेव फुटले होते. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कचवे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : VIDEO: धक्कादायक! नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा घरासमोरच हत्या

पोलिसांच्या पहाटे तीन वाजेपर्यंत चाललेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांनाही खुशालनगर भागातून ताब्यात घेण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder of a youth for revenge of molesting a girl in hingoli pbs