घाटकोपर येथील व्यावसायिकाचा खून करून प्रेताची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी बारामतीच्या एका महिलेसह सातारा जिल्हय़ातील सहा युवकांना वाठार स्टेशन पोलिसांनी अटक केली असून या सर्वाची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कलवरसिंग मोहनसिंग गुज्जर (वय ४२, रा. १ नवजीवन सोसायटी अशोकनगर हील, ३ बीएम सी शाळेजवळ, घाटकोपर पश्चिम, मुबंई) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
मगील तीन आठवडय़ापासून  कलवरसिंग बेपत्ता होते. तशी फिर्याद चिरागनगर (घाटकोपर)पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. यांचा घाटकोपर येथे इलेक्टॉनिक्स वस्तू उत्पादित करण्याचा आणि वाशी येथे बार आणि हॉटेलचा व्यवसाय होता.
 रतन दयानंद गायकवाड (रा.भाटवाडी, मुंबई, मूळ गाव काळे चाळ, भिगवन चौक, बारामती) ही महिला या व्यावसायिकासोबत ‘ लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये रहात होती. ती या परिसरात दहा वर्ष कामाला होती. मागील वर्षांपासून तिने काम सोडले होते. दि १३ ऑगस्टला  कलवीरसिंग हे नेहमीप्रमाणे वाशी येथील हॉटेलवर गेले होते. मात्र घरी परतले नाहीत . दुसऱ्या दिवशीही ते परतले नाहीत. त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता वेगवेगळय़ा क्रमांकाचे पाचही मोबाईल बंद होते. त्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली होती. विवेक अशोक येवले हा रतनचा मानलेला भाऊ असून कलवीरसिंग हल्ली अन्य महिलांच्या नादी लागला असून आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे रतनने विवेकला सांगितले होते.
दरम्यान सातारा येथील शाहू स्टेडियमच्या समोर या प्रकरणातील संशयित भेळ खान्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्यात खूनप्रकरणाची चर्चा झाली. ती भेळवाल्याने ऐकली होती. भेळ खाल्ल्यानंतर या संशयिताचे भेळवाल्यासोबत भांडण झाले. ते मिटविण्यासाठी पोलीस तेथे पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. कलवीरसिंगचा खून करून त्याचा मृतदेह त्याच्याच मोटारीतून फडतरवाडी कोरेगाव येथील भाडळे घाटातील निर्जनस्थळी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी विवेक अशोक येवले, निखिल प्रकाश वाघमळे (रा. अंबवडे संमत कोरेगाव), राजेश विलास कांबळे (रा. अंबवडे संमत, कोरेगाव, हल्ली करंजे सातार) संतोष बाबासाहेब बनसोडे (रा. करंजे, सातारा) पृथ्वीराज अनिल वैराट, दीपक नारायण आवळे (रा. किकली, ता, वाई) व रतन दयानंद गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वानी रतनच्या घाटकोपर येथील निवासस्थानी रतनच्या सांगण्यावरून उशीने तोंड दाबून खून केला असून त्याची आठवडय़ाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी कलवीरसिंगची मोटार ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी ही माहिती कलवीरसिंगच्या नातेवाईकांना कळविल्यानंतर ते मुबईतून वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.