जामखेडमध्ये पिता-पुत्राचा खून

शेतीच्या व जमिनीच्या वादातून नातलगांच्या जमावाकडून वडील व मुलाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना जामखेडजवळील काटेवाडीमध्ये सोमवारी सकाळी घडली. पोलिसांनी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील ५ जणांना अटक केली आहे.

शेतीच्या व जमिनीच्या वादातून नातलगांच्या जमावाकडून वडील  व मुलाचा निर्घृण खून करण्यात आल्याची  घटना जामखेडजवळील काटेवाडीमध्ये सोमवारी सकाळी घडली. पोलिसांनी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील ५ जणांना अटक केली आहे. जमावाने मारहाणीसाठी पिस्तूल, तलवार, कोयता, लाठय़ाकाठय़ांचा वापर केला. जमावाने वडील व मुलाला भल्या पहाटेच झोपेत असताना फरफटत, ओढत बाहेर आणले व तलवार, कोयत्याने वार केले.
आसाराम यशवंत बहिर (वय ६५) व त्यांचा मुलगा नितीन (वय २५) हे दोघे मारहाणीत मृत्युमुखी पडले तर आसाराम यांची पत्नी गयाबाई (वय ६०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. जमावाकडे पिस्तूल होते, मात्र त्याचा वापर झाला नसल्याचा दावा पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. बहिर कुटुंबावर हल्ला करणारे नातलग त्यांचे चुलत भाऊच असल्याचे व ते शेजारीच राहात असल्याचे समजले.
पंधरा दिवसांपूर्वीच खर्डा येथील दलित समाजातील युवकाच्या क्रुर हत्येमुळे महाराष्ट्र भयभीत झाला असताना पुन्हा जामखेड तालुक्यात दुहेरी खुनाचा प्रकार घडला आहे. बहुतांश आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
काटेवाडी जामखेडपासुन ७ किमी अंतरावर आहे. सकाळी सहा ते सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. जामखेड पोलिसांनी महादेव गहिनीनाथ बहिर, राजेंद्र महादेव बहिर, सचिन महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहिर, सुखदेव बहिर आदी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात महादेव बहिर यांचे जावई विष्णू सीताराम जगदाळे यांचाही समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही बहिर कुटुंबात शेतीचा व जमिनीचा वाद होता, त्यातून अनेकदा भांडणे झाली आहेत, आज सकाळी अचानक जमाव शस्त्रे घेऊन आसाराम बहिर यांच्या घरात घुसला, त्यांनी आसाराम व त्यांचा मुलगा नितीन या दोघांना फरफटत बाहेर आणले व तलवार, कोयत्याने वार केले. मध्ये पडलेल्या गयाबाई यांच्यावरही वार करण्यात आले. माहिती मिळताच साडेदहाच्या सुमारास पोलीस काटेवाडीत गेले. त्यांनी तिघांना प्रथम जामखेडच्या रुग्णालयात व नंतर नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र नगरला आणले जात असतानाच रस्त्यात आसाराम व नितीन या दोघांचा मृत्यू झाला.
घटनास्थळास अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट दिली. सायंकाळी ५ आरोपींना अटक करण्यात आली, त्यांची नावे समजू शकली नाहीत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पायील करत आहेत.

 

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Murder of father and son in jamkhed