इगतपुरीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, कुटुंबाचा ‘काळ’ ठरला सख्खा चुलत भाऊ

इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव परिसरात शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाने खळबळ

प्रतिकात्मक छायाचित्र

इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव परिसरात शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाने चुलती, भावजय, नातवाची हत्या केल्याचे उघड झाले. संशयिताने घरातील अन्य एका बालकावरही हल्ला केला, पण वेळीच तो घराबाहेर पळाल्याने बचावला. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

या हत्याकांडामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माळवाडी येथे गणेश चिमटे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. काही कामानिमित्त गणेश कावनईला गेला होता. घरात त्याची आई, पत्नी, मुले होती. शेजारीच राहणारा त्याचा चुलत भाऊ सचिन चिमटेने (२१) अचानक घरात शिरुन चुलती हिराबाई चिमटे, भावजय मंगल(३०) यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. महिलांना कोणताही प्रतिकार करता आला नाही. झटापटीत रोहीत चिमटे याच्या मानेवर शस्त्राचा घाव बसला. हिराबाई चिमटे आणि मंगल चिमये या सासू-सुना जागीच ठार झाल्या. संशयिताने याच कुटुंबातील यश या बालकावर हल्ला केला. पण तो तात्काळ घराबाहेर पळाल्याने बचावला. रोहित आणि यश चिमटे दोघे जखमी झाल्याने त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहितचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला तर जखमी यशवर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अतुल झेंडे , सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित सचिन चिमटेला ताब्यात घेतले.

सख्खा चुलत भाऊ या कुटुंबाचा काळ ठरला. संशयित अविवाहीत असून आई-वडिलांसोबत राहत होता. १२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या २१ वर्षीय संशयिताने हे कृत्य का केले असावे, याबद्दल उलयसुलट चर्चा होत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Murder of three family members in igatpuri

ताज्या बातम्या