घराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक घटनाक्रम उघड | Murder of wife and two daughter during domestic violence in Dombivali | Loksatta

घराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक घटनाक्रम उघड

कौटुंबिक वादातून डोंबिवलीमध्ये आरोपी पतीने पत्नीसह स्वतःच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली.

घराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक घटनाक्रम उघड
(प्रतिकात्मक छायाचित्र)

कौटुंबिक वादातून डोंबिवलीमध्ये आरोपी पतीने पत्नीसह स्वतःच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आरोपीने आधी घराला आग लागल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी आरोपीचा बनाव उघडा पाडला. या घटनेत आरोपीच्या पत्नीसह दोन्ही मुलींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

प्रसाद पाटील असं निर्दयी पतीचे नाव आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीनंतर आरोपी पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली भोपर परिसरात प्रसाद पाटील त्याची पत्नी प्रीती आणि मुलगी समीरा व समीक्षा यांच्यासह राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार प्रसाद आणि प्रीतीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. पत्नीशी सुरू असलेला वाद संपवण्यासाठी आरोपी पती प्रसादने एक कट रचला.

कौटुंबिक वादातून प्रसादने पत्नी प्रीतीला रात्री झोपेत रॉकेल टाकून पेटवले. या आगीत महिलेसह दोन मुलीही जखमी झाल्या. आरोपीदेखील काही प्रमाणात भाजला. त्याने आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. लोकांनी त्यांची मदत करत प्रसाद व त्यांच्या पूर्ण कुटुंबाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांना घरात आग लागल्याची शंका झाली. मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासा दरम्यान चार दिवसांपूर्वी प्रसादने पत्नी प्रीतीला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न केल्याचं आणि घरच्यांच्या बैठकीनंतर दोघांचे वाद संपल्याची माहिती मिळाली. बैठकीत प्रीतीच्या घरच्यांनी प्रीतीला माहेरी येण्यास सांगितले. मात्र, प्रसादने नवरात्रीनंतर तिला माहेरी जाण्यास सांगितले.

हेही वाचा : विश्लेषण : घरगुती हिंसाचार कायदा काय आहे? फायदे कोणते? गैरवापर होऊ शकतो का?

या माहितीनंतर पोलिसांनी तिच्या नवऱ्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्,र नंतर पत्नी प्रीती व तिच्या दोन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी आता प्रसाद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

सध्या आरोपी पती प्रसादवरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. मात्र, त्याच्यावर उपचार संपल्यानंतर पोलीस त्याला अटक करून न्यायालयात हजर करणार आहेत, अशी माहिती डोंबिवली एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.

तक्रारीत काय म्हटलं?

प्रसादचे अन्य एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याने तो प्रीती आणि तिच्या मुलींना अनेक वर्षापासून त्रास देत होता. तिचा शारीरिक, मानसिक छळ करत होता. कोणत्या तरी पदार्थाचा वापर करुन प्रसाद पाटील याने पत्नी, त्याच्या दोन्ही मुलींना पहाटेच्या वेळेत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिघी ९१ टक्के भाजल्या, असे प्रीतीच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. प्रीतीचे माहेर पेण तालुक्यातील होते.प्रसादकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रीतीने यापूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द तक्रार केल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2022 at 14:35 IST
Next Story
“उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्याची तुमची लायकी नाही”, किशोरी पेडणेकरांनी मनसेला सुनावलं; म्हणाल्या, “एैरा, गैरा…”