अलिबाग- मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथील बोट दुर्घटनेची घटना ताजी असतांनाच आता रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथील पर्यटकांच्या बोट प्रवासाचा थरारक प्रवासाची एक चित्रफीत समोर आली आहे. ज्यात अक्षरशः जीव मुठीत घेऊन पर्यटक प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. अतिशय धोकादायक पध्दतीने बोटीतून चढ उतार करत असल्याचे या चित्रफीतीत दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.

मुरुड येथील नवाबकालीन जंजीरा किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या पर्यटकांना किल्ल्यात जाण्यायेण्यासाठी राजपूरी येथून शिडाच्या बोटी सोडल्या जातात. वाऱ्याच्या दिशेवर शिड नियंत्रित करून किल्ल्यात जाणे आणि तिथून परत येणे हा एक विलक्षण अनुभव असतो, मात्र आता या बोटींवरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा आता समोर आला आहे.

बोटीतून क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांची वाहतूक केली जात असून, बोटीतील प्रवाश्यांना सुरक्षा जॅकेटही उपलब्ध करून दिले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. भरतीच्या वेळी किल्ल्याजवळ बोटी लागण्यात अडचणी येतात. त्यामुळे बोटीतून उतरतांना प्रवाश्यांना मोठी कसरत करावी लागले.

जीव मुठीत घेऊन बोटीतून खाली उतरावे लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पाऊले उचलण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. बोटीतील प्रवासी संख्या नियंत्रित ठेवावी, प्रवाश्यांना सुरक्षा जॅकेट परिधान करणे बंधनकारक करावे, किल्ल्यात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी सुरक्षित फ्लोटींग जेटी असावी अशी मागणी केली जात आहे.

जबलपूर येथे काय घडले

मध्यप्रदेश येथे जबलपूर येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने, १३ जणांचा मृत्यू झाला. तर २५ वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेचे नंतर संपुर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकाचे फोटोचे समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले,  ज्यामुळे जगभरातून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला गेला. अनेकांचे डोळे पाणावले. मध्यप्रदेश सरकारने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या घटनेमागे सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष हे या दुर्घटनेमागचे मुळ कारण असल्याचे आता सांगितले जात आहे. दरम्यान जबलपूर येथील या घटनेची दखल घेऊन मुरुड जंजीरा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलण्याची मागणी केली जात आहे. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.