मुरुड जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. किल्ल्यावर पर्यटकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांच्या सुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. २ जानेवारीपर्यंत किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत.
मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. राजपूरी जेटीवर पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करणे अवघड जात होते. अंतर नियम आणि मुखपट्टी वापराचे नियम पर्यटकांकडून पाळले जात नव्हते. वारंवार सूचना देऊनही करोना विषयक नियमांचे उल्लघन होते होते. हिबाब किल्ल्याचे दरवाजेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाताळाचा सण आणि सलग सुट्ट्या यामुळे जिल्ह्यात हजारो पर्यटक दाखल होत आहेत. त्य़ामुळे पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी होत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठीही मोठ्या संख्येनी पर्यटक जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातही काही प्रतिबंधाकात्मक पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे पोलीस दलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला सुचित करण्यात आले होते. यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत मुरुड जंजिरा किला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
