अलिबाग: मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा दिलीप बोऱ्हाडे यांना २ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या कारवाईमुळे मुरुडसह परिसरातील शासकीय कार्यालयांत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ठेकेदाराने एकदरा, राजपुरी आणि खोकरी या गावांतील रस्त्यालगत स्लॅब ड्रेनचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाचे पूर्ण बिल व अंदाजपत्रक तयार करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांनी तक्रारदाराकडे प्रथम ३ लाखांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती २ लाख ५० हजार स्वीकारण्याचे ठरले.
याबाबत संबंधित ठेकेदाराने अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तक्रारदाराकडून २ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना श्रद्धा बोऱ्हाडे यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई अलिबाग, रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. या मोहिमेत पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक नारायण सरोदे तसेच विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, सुमित पाटील, सचिन आरपाडकर, नवदित नांदगावकर आणि मोनिका मोरे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.
