Muslim Polygamy Laws discussion in Maharashtra Assembly : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस वादळी ठरला. आज विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदार सना मलिक यांनी मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथांविरोधातील कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी कुराणातील तरतुदींचा संदर्भ देत, त्या भारतातही लागू करण्याची मागणी सभागृहात केली. यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची बाजू मांडली.

“कुराणमधील नियमांची अंमलबजावणी करा”

“अत्याचार फक्त मुस्लिम महिलांवरच होतात का?” असा सवाल करत सना मलिक म्हणाल्या, “मुस्लिम कायद्यांतर्गत बहुपत्नीत्व मुस्लिम समाजात मान्य आहे. कुराणमधील ज्या नियमांची अंमलबजावणी पाकिस्तानने केली आहे, तशीच ती भारतानेही करावी, अशी आमची मागणी आहे; कारण इस्लाममध्ये कुराणचे नियम सर्वोच्च मानले जातात.”

तलाकचे तीन प्रकार

तलाकच्या प्रकारांवर बोलताना त्या म्हणाल्या, “तलाकचे प्रामुख्याने काही प्रकार आहेत; तलाक-ए-अहसान, तलाक-ए-हसन आणि तलाक-ए-बिद्दत (तिहेरी तलाक). त्यापैकी तलाक-ए-अहसान आणि तलाक-ए-हसन या पद्धती आम्ही पाळतो. तलाक-ए-बिद्दत हा पिढीजात प्रकार असून, त्याचा आमच्या मूळ धर्मात समावेश नाही. म्हणजेच जी पद्धत आमच्यात अस्तित्वातच नाही, तीच रद्द करण्यात आली आहे”, असा दावा त्यांनी केला.

बहुपत्नीत्व इतर समाजातही

त्या पुढे म्हणाल्या, “बहुपत्नीत्व मुस्लिम समाजात मान्य असले, तरी फक्त मुस्लिम समाजातील पुरुषच एकापेक्षा अधिक लग्न करतात का? दुसऱ्या धर्मातील पुरुष एकापेक्षा अधिक लग्न करत नाहीत का? बहुपत्नीत्वाचेही काही कठोर नियम आहेत. त्यामुळे जर कोणी एकापेक्षा अधिक विवाह करत असेल, तर त्यांना पाकिस्तानचा संदर्भ न देता इस्लामच्या कुराणचा संदर्भ दिला पाहिजे”, असं मत सना मलिक यांनी मांडलं.

देश संविधानावर चालते, कुराणवर नाही – अतुल भातखळकर

सना मलिक यांची लक्षवेधी सूचना मांडून पूर्ण होत नाही तोवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र आक्षेप घेत बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, “ही लक्षवेधी सूचना ‘तीन तलाक’ कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होतेय की नाही, याबद्दल आहे. मात्र सना मलिक येथे कुराण आणि मुस्लिम धर्माच्या परंपरांवर व्याख्यान देत आहेत. हा देश केवळ आणि केवळ संविधानाने चालतो, तो कुराणाने चालत नाही.”

कायदा विशिष्ट धर्मियांसाठी नसतो – योगेश कदम

या वादावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “आपले विधिमंडळ आणि आपला देश पूर्णपणे संविधानाने चालतो. कुराणमधील किंवा इतर कोणत्याही धर्मग्रंथातील बाबी पाहून कायदा तयार करता येत नाही. सर्व धर्मांचा सन्मान राखणे आणि कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही, याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. ‘तीन तलाक’च्या तक्रारी इतर धर्मांमधून आलेल्या नसून एका विशिष्ट समाजातून येत आहेत. परंतु, कायदा तयार करताना तो केवळ विशिष्ट धर्मीयांसाठी नसतो, तर तो सर्वांना समान लागू होतो.”

“बहुपत्नीत्व कोणत्या समाजात आहे, याच्या खोलात मला जायचे नाही. मात्र, एकदा का युसीसी (समान नागरी कायदा) लागू झाला की तो सर्वांनाच लागू होईल. हा कायदा कोणत्याही एका धर्मापुरता किंवा समाजापुरता मर्यादित नाही. मी सभागृहाला आश्वासित करतो की, कोणत्याही एका धर्माला टार्गेट करून कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, कायदा सर्वांसाठी समान असेल”, असं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिलं.