मीरा रोड येथील फातिमा खातून या ३१ वर्षीय महिलेने ६ जून रोजी कोल्हापूर-मुंबई-महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये एका चिमुकलीला जन्म दिला. कोल्हापूर-मुंबई-महालक्ष्मी एक्स्प्रेसने लोणावळा स्थानक ओलांडल्यानंतर या महिलेची ट्रेनमध्येच प्रसुती झाली. त्यामुळे या महिलेच्या पतीने त्या मुलीचे नाव ट्रेनच्या नावावरून महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुपती ते कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत प्रवास करणाऱ्या तय्यब यांनी सांगितलं की, माझ्या मुलीचा या ट्रेनमध्ये जन्म होणं म्हणजे देवीचे दर्शन घेण्यासारखे आहे. म्हणून मी तिचे नाव महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला.” कर्जत रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) या महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला तत्काळ वैद्यकीय मदत पुरवली. पोलिसांच्या या तत्परतेचंही तय्यब यांनी कौतुक केलंय.

या जोडप्याला आधीच तीन मुले आहेत. फातिमाची प्रसुती तारीख २० जून असल्याने कुटुंबाने कोल्हापूर ते मुंबई असा रेल्वे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तय्यब म्हणाले, “इंजिन बिघडल्यामुळे ट्रेन दोन तासांपेक्षा जास्त वेळ लोणावळा येथे थांबली. रात्री ११ च्या सुमारास ती पुन्हा सुरू झाली, तेव्हा माझ्या पत्नीच्या पोटात दुखू लागलं, त्यामुळे ती शौचालयात गेली. परंतु, बराचवेळ झाला तरी ती परत न आल्याने मी तिला पाहायला गेलो. तिथे जाऊन पाहतो तर तिची प्रसुती झाली होती. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अनेक महिला प्रवासी मदतीला पुढे आल्या.

हेही वाचा >> रोज ‘म.रे.’ त्याला.., कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल १५ मिनिटे उशिराने

आई आणि बाळाला घरी सोडलं

ट्रेनमधील एका जीआरपी कॉन्स्टेबलने तय्यबला जीआरपी हेल्पलाइनवर कॉल करून परिस्थितीची माहिती देण्यास सांगितले. गाडी कर्जत स्टेशनवर आल्यावर कुटुंब गाडीतून उतरले. कर्जत जीआरपीचे एपीआय मुकेश ढेंगे म्हणाले, “आम्ही कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला सूचित केले आणि परिचारिका शिवांगी साळुंके आणि कर्मचारी स्टेशनवर पोहोचले. महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.” तीन दिवसांच्या उपचारानंतर आई आणि बाळाला घरी सोडण्यात आल्याचे हॉस्पिटलच्या सहाय्यक मॅट्रन सविता पाटील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य प्रदेशातही घडला होता असाच प्रकार

मार्च महिन्यातही कामायनी एक्स्प्रेसमध्ये असाच प्रकार घडला होता. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एका २४ वर्षीय महिलेने मुंबई-वाराणसी कामायनी एक्स्प्रेसमध्ये एका मुलीला जन्म दिला. या नवजात बाळाच्या जन्मानंतर ट्रेनचंच नाव बाळाला देण्यात आले. ट्रेनमध्ये प्रसूती होण्याच्या अनेक घटना घडत असतात. अशावेळी जीआरपी आणि सहप्रवासी नेहमीच मदतीला येतात. परंतु, गरोदर स्त्रीने लांबचा प्रवास टाळायला हवा.