Dasara Melava 2022 Latest News: शिवसेनेचा शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून असंख्य शिवसैनिक आणि कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होतं आहेत. अनेक नागरिक स्व-खर्चाने मुंबईत येत आहे.

याच पार्श्वभूमीवर एका मुस्लीम तरुणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवला आहे. त्याने आपल्या रक्ताने पोस्टर लिहून अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीन, असं सांगितलं आहे. अजिज मोमीन असं या मुस्लीम तरुणाचं नाव आहे. “आखरी सांस तक उद्धव ठाकरेसाहब के साथ रहुंगा- मस्लीम मावळा अजिज मोमीन” असं त्याने पोस्टरवर रक्ताने लिहिलं आहे.

हेही वाचा- Dasara Melava 2022: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची असेल का? सुनील राऊत म्हणाले…

रक्ताने लिहिलेलं पोस्टर घेऊन मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर अजिजने आपली भूमिका मांडली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना अजिज म्हणाला, “आज मी जी भूमिका घेतली आहे, याच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की, हे पोस्टर मी माझ्या रक्ताने लिहिलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिन. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आज महाराष्ट्रात जी लढाई सुरू आहे, त्या लढाईत मी माझ्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्यासाठी तयार आहे. त्यासाठी मी मुंडकं छाटण्यासाठीही तयार आहे आणि मुंडकं छाटून घेण्यासाठीही तयार आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया अजिज मोमीन यानं दिली आहे.