Sinhagad Fort Poster Controversy: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर अज्ञात इसमांनी लावलेल्या एका पोस्टरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. “हा किल्ला हिंदूंचा असून इथे मुस्लिमांना प्रवेश नाही”, असा संदेश या पोस्टरवर लिहिण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वन विभागाने तत्काळ हे पोस्टर इथून हटवले. या प्रकरणी अद्याप कुणी तक्रार दाखल केलेली नाही. मात्र पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.
द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मंगळवारी सकाळी सिंहगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारानजीक असलेल्या वाहनतळाच्या बाजूला लोखंडी बोर्डवर हे पोस्टर चिकटवले गेले होते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही लगेचच हे पोस्टर इथून काढून टाकले. मंगळवारी पहाटे कुणीतरी इथे येऊन जुन्या लोखंडी बोर्डवर हे छापील पोस्टर चिकटवले. मराठीत संदेश असलेल्या या पोस्टरवर लिहिले होते, “हा किल्ला हिंदूंचा आहे. मुस्लिमांना प्रवेश करण्याची परवानगी नाही.” संदेशाच्या खाली ‘हुकुमावरून’ असेही लिहिले होते.
वन विभागाने म्हटले की, समाजकंटकांनी जाणूनबुजून या पोस्टरवरील संदेशाखाली हुकुमावरून असा शब्द लिहिला होता. जेणेकरून हा सरकारी आदेश असल्याचे भासावे, असा त्यांचा प्रयत्न होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि सिंहगडाची लढाई या इतिहासाशी संबंधित असलेला हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा असा वारसा आहे. अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. हा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचे जंगल वन विभागाच्या अखत्यारित येते.
पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याने पोस्टर प्रकरणावर बोलताना म्हटले की, पोस्टर लावल्याबद्दल अद्याप औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. मात्र आम्ही किल्ल्याला जोडणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहोत. यातून संशयितांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे.
