सुवर्ण गणेशाची दिवेआगर येथे पुनस्र्थापना

अलिबाग :  कोकणच्या विकासाकडे महाआघाडी सरकारचे लक्ष आहे, त्यामुळे या परिरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते दिवेआगर येथे सुवर्ण गणेश पुनस्र्थापना सोहळ्यात बोलत होते, दिवेआगर येथील ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली. तर समुद्रकिनारा सुशोभीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कोकण विकासासाठी भरभरून मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरार व मुंबई अलिबाग असा विकासाचा मार्ग विकसित होतोय, महाड येथे एनडीआरएफ बेस कॅम्प उभारणी केली जाणार आहे, रोहा मुरुड परिसरात बल्क ड्रग पार्क प्रस्तावित आहे, शेतीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटक धोरण तयार केले आहे. पर्यटनावर आधारित रोजगार निर्माणसाठी बीच शेक्स पॉलिसी तयार करण्यात आली आहे,

पाली व महड अष्टविनायक बल्लाळेश्वर तीर्थक्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टीने भरीव पर्यटन निधी देणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

कोकणाच्या शैक्षणिक विकासावर राज्य सरकार भर देत असून, अलिबाग आणि सिंधुदुर्ग येथे आरोग्य महाविद्यालय सुरू केली जात आहेत, रत्नागिरी जिल्ह्य़ात अभियांत्रिकी आणि विधी महाविद्यालय सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

 दिवेआगर गुन्ह्य़ाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला, न्यायालयात खटला चालविणाऱ्या सरकारी अभियोक्ता यांनाही यावेळी गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने अमोल गायकवाड, संजय शुक्ल, प्रसाद पाटील, भूषण साळवी, अमित शेडगे यांना देवस्थान समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

सुरक्षा व्यवस्था वाढवली मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार मंदिर परिसरात पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली आहे.