Rajya Sabha Election Maharashtra 2025 Updates on MVA conflict : विधानसभा निवडणुकीपासून पीछेहाट झालेल्या काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत फारशी एकवाक्यता राहिलेली दिसत नाही. तसाही सत्ताधारी महायुतीमध्येही समन्वयाचा अभाव आढळतो. पण निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने महायुतीतील मतभेद झाकोळले गेले. याउलट महाविकास आघाडीतील धुसफूस अधिकच जाणवू लागली आहे. सध्या निमित्त झाले आहे ते राज्यसभेच्या निवडणुकीवरून. राज्यात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीला एक जागा मिळू शकते. पण या एका जागेवरून महाविकास आघाडीत दावे-प्रतिदावे सुरू झाल्याने ही एकमेव जागा तरी महाविकास आघाडीला मिळते की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.

राज्यसभेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे चार खासदार आहेत. शरद पवार आणि फौजिया खान (राष्ट्रवादी), रजनी पाटील (काँग्रेस) व प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना ठाकरे) यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक असल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी (शरद पवार) १० आमदार, असे एकूण ४६ आमदार आहेत. विजयासाठी ३७ मतांची आवश्यकता असल्याने तिन्ही पक्षांची आघाडी कायम राहिल्यास एक जागा सहजच निवडून येऊ शकते. पण सध्या शिवसेना व काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला आहे. त्यातून दोन पक्षांमधील मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नाव शिवसेनेचे संजय राऊत यांनी आधी सुचविले होते. शरद पवार हे उमेदवार असल्यास शिवसेना व काँग्रेस पाठिंबा देऊ शकतात. पण शरद पवारांनी अद्याप राज्यसभा निवडणूक लढविण्याबाबत काहीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. शरद पवार सध्या पुण्यातील रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातून ते घरी परतल्यावर राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली जाईल, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

वादाचे कारण काय?

राज्यसभेची जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. कारण २०२० मध्ये शिवसेनेने ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली होती, असा दावा त्यांनी केला आहे. शरद पवारांबद्दल आदर आहे, पण ही जागा आम्हाला मिळावी, अशी ठाकरे यांची मागणी आहे. तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेससाठी राज्यसभेची जागा महत्त्वाची आहे. यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्यासाठी आम्ही सोडू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे म्हणणे आहे.

शरद पवार गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय अधिक चर्चेत आला. विलीनीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी अजित पवार गटाने आमच्याशी चर्चा करावी, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. तसेच अजित पवारांनी आपल्याशी विलीनीकरणाची कधीच चर्चा केली नव्हती, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही, अशी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची भूमिका आहे. हा सर्व राजकीय खेळ सुरू असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे कोणीही उपस्थित न राहिल्याने संशय अधिकच बळावला. शरद पवार गटाने हेतूपरस्पर विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळल्याचे बोलले जाते. विलीनीकरणाच्या चर्चेमुळेच शरद पवार गटाने भाजपच्या विरोधात उघडपणे भूमिका घेण्याचे टाळल्याची चर्चा सुरू झाली.

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी दबाव?

विधान परिषदेचे नऊ आमदार मे महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली तरच विरोधकांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेवर निवडून आले पाहिजेत, अशी जनतेची भावना आहे, असे संजय राऊत सांगतात. शिवसेनेला राज्यसभेची जागाही हवी आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवावे, अशीही भूमिका मांडली जात आहे. शिवसेनेने राज्यसभा तसेच विधान परिषद या दोन्ही जागांवर दावा केल्याने महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही, असा संदेश गेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर निवडून येण्याचा मार्ग मोकळा व्हावा, या उद्देशानेच राज्यसभेसाठी शिवसेनेने दबावाचे राजकारण करीत असल्याचे काँग्रेसच्या गोटात बोलले जाते.

शरद पवार गटाविना निवडणूक जिंकता येऊ शकते का?

शरद पवार गट विरोधात गेल्यास काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन निवडणूक जिंकता येऊ शकते. राज्यसभेसाठी ३७ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना २० तर काँग्रेसचे १६, असे एकूण ३६ संख्याबळ होते. समाजवादी पार्टीची दोन मते मिळू शकतात. त्यामुळे शरद पवार गटाचे १० आमदार बरोबर नसले तरी शिवसेना ठाकरे व काँग्रेस एकत्रित ही जागा जिंकू शकतात. अर्थात, मतांची होणारी फाटाफूट दोन्ही पक्षांना टाळावी लागेल. अशा वेळी राज्यसभेसाठी काँग्रेस अडून बसेल. विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना निवडून यायचे असल्यास शिवसेनेला राज्यसभा सोडावी लागेल. कारण राज्यसभा तसेच विधान परिषद या दोन्ही जागांवर शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार नाही.

santosh.pradhan@expressindia.com