महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना २८ जून रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या संजय राऊत यांना २८ जून रोजी दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात अधिकार्‍यांसमोर हजर राहून त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काही क्षणांतच त्यांची खिल्ली उडवली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, “संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा. एकनाथ शिंदे यांचा गट अपात्रतेबाबत न्यायालयीन लढाई जिंकेल,” असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

एप्रिलमध्ये, ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि दोन सहकार्‍यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. संजय राऊत यांना पाठवण्यात आलेल्या समन्सवर शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ईडीने भाजपाच्या भक्तीचे उदाहरण दिले आहे. त्यानुसार त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याचसंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये राऊत यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संजय राऊतांची प्रतिक्रिया

ईडीने समन्स बजावल्यानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या आणि मला अटक करा अशा शब्दांत आव्हान दिलं आहे. मला रोखण्यासाठी हे कारस्थान रचलं जात असून, माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही असंही ते म्हणाले आहेत. संजय राऊतांनी यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केलं आहे. ईडीने संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणी समन्स बजावलं असून उद्या हजर राहण्यास सांगितलं आहे.