महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषण केल्याच्या प्रकरणात अशोक खरात या भोंदूबाबाला अटक करण्यात आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. अशोक खरात या भोंदूची पाद्यपूजा करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. तसंच रुपाली चाकणकर यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोपही झाले होते. अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आशा मिरगे यांनी जे आरोप केले त्याविरोधात आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या महिलांविरोधात रुपाली चाकणकर यांनी आता भूमिका मांडली आहे. तसंच आपली लढाई ही आता कायद्याच्या चौकटीत राहून आपण लढणार आहोत असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

अशोक खरात प्रकरणात पहिल्या दिवसापासून माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. खरातच्या कुठल्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीच्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नव्हता. मी कुठल्याही महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओही होता, तरीही गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य भाषेत विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर केलेले आरोप वेदनादायी होते. त्यामुळे आता माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे. इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबीयांनी खरातला गुरु मानलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडीओ होता तो अतिशय जुना व्हिडीओ होता. मी तेव्हा महिला आयोगाची अध्यक्षाही नव्हते. तरीही खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शक व्हावा यासाठी मी महिला आय़ोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तरीही माझ्यावर जी काही चिखलफेक झाली आणि AI चा वापर करुन ज्या पद्धतीचे व्हिडीओ तयार केले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. त्यामुळेच आता लढाई कायद्याच्या चौकटीतून लढणार आहे.

Rupali Chakankar News
रुपाली चाकणकर यांची ईडी आणि एसआयटीकडून मे महिन्यात चौकशी करण्यात आली. (फोटो-रुपाली चाकणकर, फेसबुक पेज)

आशा मिरगे यांना मी नोटीस पाठवली आहे

आशा मिरगे या बाईने एका डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेत जी विधानं केली ती विधानं ऐकून मला धक्काच बसला त्यामुळेच मी ४ एप्रिलला पहिली नोटीस आशा मिरगेला पाठवली होती. कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे नंतर दोनदा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ही नोटीस पाठवली. एकंदरीत तीनवेळा नोटीस पाठवली पण आशा मिरगेने नोटीस स्विकारली नाही. अनक्लेम्ड म्हणून ही नोटीस परत आली. त्यामुळे मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. माननीय न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन आशा मिरगेला २ जुलै २०२६ ला सकाळी ११ वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढली आहे. त्यावेळी मीदेखील हजर असेनच, कारण आता हा लढा स्त्रित्वाच्या सन्मानाचा आहे. आशा मिरगे प्रमाणेच इतर काही महिलांनीही कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल अशी विधानं केली. सातत्याने बदनाम कऱण्याचा प्रयत्न केला. कोणताही पुरावा त्या सादर करु शकल्या नाहीत. त्या सगळ्यांना दोन दिवसांपासून मी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नोटिसा पाठवल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयातही मी उपस्थित राहणार आहे.

स्त्रित्वाचा सन्मान झाला पाहिजे, सत्य प्रखरपणे तुमच्या समोर आहे-रुपाली चाकणकर

स्त्रित्वाचा सन्मान झाला पाहिजे आणि कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ नयेत यासाठी हा लढा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, जिजाऊ, रमाई, भिमाईचा महाराष्ट्र आहे. संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला या विकृत लोकांनी विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. म्हणून या विकृतीच्या विरोधात माझा लढा आहे. ही लढाई मी निश्चितपणे लढेन. पहिल्या दिवसापासून जे सांगते आहे ते पुन्हा सांगते, सत्य प्रखरपणे तुमच्या समोर आहे. कुठलाही पुरावा नसताना माझ्यावर आरोप झाले आहेत. कुठलंही गैरकृत्य, दुष्कृत्य कधीही केलेलं नाही. इतरांप्रमाणे आम्हीही अध्यात्मिक गुरु म्हणून खरातला मानलं होतं. यापलिकडे आमची कुठलीही भूमिका नव्हती. त्यामुळेच मी माझा लढा कायद्याच्या चौकटीतून लढते आहे. २ जुलैला सकाळी ११ वाजता आशा मिरगेने हजर व्हावं, मी स्वतः माझगाव कोर्टात असेन. असं रुपाली चाकणकारांनी म्हटलं आहे.

Rupali Chakankar Reaction About Ashok Kharat
अशोक खरातशी कुठलाही आर्थिक व्यवहार केलेला नाही. रुपाली खरात यांचं विधान (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

गुवाहाटीच्या फोटोबाबत मे महिन्यात रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या?

गुवाहाटीचा जो फोटो तु्म्ही सगळ्यांनी पाहिला आहे तो नीट पाहिला तर कळेल माझ्या कुटुंबासह खरातचं कुटुंबही तिथे आहे. आम्ही खरातसह प्रवास केला नव्हता. अशोक खरात तिथे दर्शनासाठी त्याच्या कुटुंबासह आणि त्याच्या काही लोकांसह पोहचला होता. माझ्या कुटुंबाने यापूर्वी तिथे दर्शन केलं नव्हतं त्यावेळी आमचा भाव असा होता की गुरु बरोबर जर दर्शन करता आलं तर बरं. त्या भावनेतून आम्ही पुण्याहून आमच्या कुटुंबासह गेलो होतो. खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आला होता. दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा अध्यात्मिक भाव मनात होता. खरातला १७ तारखेला अटक केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे अनेक क्षेत्रातले अनेक लोक त्याला गुरु मानत होते, त्याच्या दर्शनासाठी जात होते. त्यामुळे आम्हीही ती भावना ठेवली होती. तो एक श्रद्धेचा भाग होता.