पुण्यात गणेशोत्सवात डीजे वरुन सध्या चांगलाच वाद सुरू आहे. पुणेकरांनी विद्यानंद बापट यांना पाठिंबा देत मोर्चाही काढाल होता. विद्यानंद बापट यांनी त्यांची भूमिका मांडताना, सार्वजनिक उत्सवातील डी.जे. आणि स्पीकर्समुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाला कडाडून विरोध केला आहे. बापट हे नास्तिक असल्याने त्यांच्या भूमिकेवरुन वाद निर्माण होऊन त्यांना मारहाणही करण्यात आल्याची घटनाही घडली. आता, मंत्री मेघना बोर्डीकर यांनी डीजेला विरोध केला आहे. तसंच डीजेमुळे माझ्या चुलत भावाचा मृत्यू झाला असंही सांगितलं आहे.

मेघना बोर्डीकर नेमकं काय म्हणाल्या?

आमदार बसवराज पाटील यांच्याकडून आयोजित कार्यक्रमासाठी मेघना बोर्डीकर धाराशिवमध्ये आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डीजेच्या आवाजामुळे माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गेल्या वर्षी गणपतीत मृत्यू झाला. सुप्रीम कोर्टाने डीजे बंदी केल्यानंतरही आपल्याला ते मान्य नसतं. सण-उत्सव साजरे करत असताना आपण काही मर्यादा घालायला हव्यात, असं स्पष्ट मत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलं. डीजे बंदीवर बोलताना आपल्या त्यांच्या भावाच्या मृत्यूची आठवण देखील माध्यमांना सांगितली. डी. जे. वरुन वाद सुरु असताना आणि विद्यानंद बापट यांची भूमिका बहुतांश पुणेकरांनी मान्य केली असतानाच आता मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही त्यांच्या भूमिकेला समर्थनच दिलं आहे. डी.जे. किती घातक आहे याबाबत बोलताना त्यांनी भावाच्या मृत्यूची घटना माध्यमांना सांगितली आहे.

मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीबाबत काय म्हणाल्या बोर्डीकर?

मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवरही मेघना बोर्डीकर यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असं बोर्डीकर यांनी म्हटलं. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळाची समिती चर्चा करत आहे, त्यांच्या मागण्याबाबत योग्य तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.