मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी डिवचल्याने खडसे विधानपरिषदेत गरजले. ‘माझी काळजी करू नका. मला मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने स्थान आहे आणि मी १२ खात्यांचा मंत्री आहे. तुम्हाला तर निवडूनही दिले नाही’, असे खडे बोल त्यांनी ठाकरे यांना सुनावले.

अग्रलेख : मुख्यमंत्री कोण?

अवकाळी पावसावरील चर्चेला खडसे हे विधानपरिषदेत उत्तर देणार होते. जळगाव दौऱ्यावर असताना खडसे यांनी चित्रपट पाहिल्यावरून प्रसिद्धीमाध्यमांमधून टीका झाली. त्याचा उल्लेख करुन खडसे म्हणाले, ‘खासगी दूरचित्रवाणीवाहिन्या आधीचे काही दाखवत नाहीत आणि नंतरचेही दाखवत नाहीत. त्यांच्या सोयीचे तेवढेच सांगतात. मी पंढरपूरला गेलो होतो. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पंचनाम्याचे आदेश दिले. मदत व पुनर्वसन मंत्री नात्याने मी काम केले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चित्रपट पाहिला. मुलीच्या लग्नासाठी हुंडा द्यावा लागणार असल्याने शेतकरी कर्ज घेतो, या विषयावरील हा चित्रपट करमुक्त करण्यासाठी महसूलमंत्री नात्याने मी पाहिला. गेल्या १४-१५ वर्षांत मी चित्रपट पाहिला नाही. पण आपला टीआरपी वाढविण्यासाठी वाहिन्यांनी ते वृत्त दाखविले’. मला मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने स्थान व मान असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. खडसे यांचे फार्महाऊस आहे, असे मुद्दा उपस्थित करून टिप्पणी करणाऱ्या विरोधकांना खडसे
यांनी ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे घर शेतात आहे व मी शेतीची सर्व कामे केली आहेत,’ असेही सुनावले.