अकोला : शनिवारी सायंकाळी आकाशात रहस्यमयी आगीचे गोळे दिसून आले. खान्देशातील जळगावपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हे दृश्य दिसले. हा उल्कापात होता की आणखी काही, याबाबत संभ्रम कायम आहे. अनेक नागरिकांनी आकाशात विविध रंगातील आगीच्या गोळय़ांचे दृश्य आपल्या भ्रमणध्वनीमध्ये टिपले.
आगीचे हे गोळे पुढे-पुढे सरकत होते. जळगाव, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये हे आगीचे गोळे दिसल्याची चर्चा आहे. आगीच्या गोळय़ामागून रॉकेटप्रमाणे धूरदेखील निघत होता, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. आकाशात अत्यंत उंचावरून हे आगीचे गोळे जात होते. जमिनीवरून ते स्पष्ट दिसले. यामुळे काही भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणदेखील पसरले होते. या प्रकाराची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा आहे.
आकाशात उल्कापात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही एक खगोलशास्त्रीय घटना असल्याचे बोलले जात आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही. आकाशातील आगीचे गोळे पुढे जाऊन नेमके कुठे पडले, हे अद्याप कळलेले नाही. यासंदर्भात माहिती घेण्यात येत असल्याचे अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.
कृत्रिम उपग्रहाचे तुकडे?
आकाशातील उल्कापात गतीने होते. शनिवारी आकाशात दिसलेले आगीचे गोळे त्या तुलनेत हळूहळू समोर जात होते. त्यामुळे उल्कापात असण्याची शक्यता कमी आहे. ते आगीचे गोळे म्हणजे आकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहाचे तुकडे असू शकतात, असा अंदाज अकोल्यातील खगोलशास्त्र अभ्यासक प्रभाकर दोड यांनी व्यक्त केला.