लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सांगोला तालुक्यातील महूद येथे तीन दिवसांपूर्वी एका टायर गोदामात पहाटे झालेल्या स्फोटाचे गूढ रविवारी चौथ्या दिवशीही कायम आहे. गोदाम मालकाने आपल्या दोन सहकाऱ्यांना स्फोट घडवायचा आहे म्हणून बोलावून घेतले होते. प्रत्यक्ष स्फोट घडविताना तो स्वतः हजर नव्हता. स्फोट घडविण्याचे कारण काय, या प्रश्नाची उकल करण्याचे आव्हान पोलीस तपास यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, स्फोट घडविणाऱ्या एका मृतासह तिघाजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

या स्फोटात अतुल आत्माराम बाड (वय ३५, रा. विठलापूर, ता. आटपाडी, जि. सांगली) हा जागीच ठार झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या दीपक विठ्ठल कुटे (वय २७, रा. शिवापुरी, ता. आटपाडी) याच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोट घडवायचा आहे म्हणून या दोघांना ज्याने बोलावून घेतले, तो गोदामाचा मालक रामेश्वर दत्तात्रय बाड (वय ३५) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी दीपक कुटे याचा जबाबही घेण्यात आला आहे. त्याने दिलेल्या जबाबात टायर दुरूस्त करण्यासाठी लागणारे सुलोशन आणि पेट्रोलचा वापर करून स्फोट घडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याची खातरजमा केली जात आहे. स्फोट घडविण्यामागचे नेमके कारण काय, याची उकल केली जात आहे.

आणखी वाचा-“मनोज जरांगेची नाटकं महाराष्ट्राला कळली आहेत, प्रसिद्धीची नशा…”; छगन भुजबळ यांची बोचरी टीका

रामेश्वर बाड हा मृत अतुल बाड याचा चुलत भाऊ आहे. तर जखमी दीपक कुटे हा रामेश्वरचा मेव्हणा आहे. सांगोल्यापासून २४ किलोमीटर अंतरावर असलेल्या महूद गावच्या शिवारात नितीन पांडुरंग नरळे यांच्या मालकीच्या जागेत असलेले गोदाम रामेश्वर बाड याने टायरचे दुकानवजा गोदाम उभारले होते.

दरम्यान, मृत अतुल याची पत्नी गीतांजली बाड हिने दिलेल्या जबाबानुसार घटनेच्या दिवशी रात्री मृत अतुल हा विठलापुरात (आटपाडी) घरात कुटुंबीयांसह जेवण करीत असताना त्याचा चुलत भाऊ रामेश्वर बाड याने मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यांचा संवाद सुरू असताना मोबाईलचा आवाज खुला (ऑन) होता. रामेश्वर याने महूदमध्ये गोदामात स्फोट घडवायचा आहे, लगेचच महूदाला ये म्हणून निरोप दिला होता. त्यानुसार जेवण अर्धवट सोडून अतुल हा दुचाकीने महूदला गेला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे घडलेली घटना समजल्याचे गीतांजली हिने जबाबात म्हटले आहे. यातून स्फोट घडवायचा आहे म्हणून रामेश्वर याने अतुल यास बोलावून घेतले आणि गोदामात स्फोट घडविताना रामेश्वर हा स्वतः हजर न राहता गावातील घरात झोपला होता, ही बाब समोर आल्यामुळे या घटनेचे गूढ कायम आहे. दरम्यान, या घटनेनंतर तज्ज्ञांच्या परीक्षणाचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या देखरेखीखाली होत आहे.