मुंबई : राज्यात नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू झाली आहे. या संस्थांच्या निकषांवर पात्र ठरणाऱ्या कांद्याचे बाजार समित्यांमधील दर १८ ते २५ रुपये किलो आहेत, तर हाच दर्जेदार कांदा नाफेड, एनसीसीएफला १६.५० रुपये किलो दराने खरेदी करावयाचा आहे. बाजारातील दरापेक्षा सरकारी खरेदीचा दर कमी असल्यामुळे जूनअखेर दोन लाख टन खरेदीचे उद्दिष्टे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे कांदा खरेदीबाबत पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी केलेल्या घोषणा हवतेच राहिल्या आहेत.

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) या देशातील सर्वोच्च ग्राहक सहकारी संस्थांकडून ग्राहक हितासाठी यंदा राज्यातून दोन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट्ये निश्चित केले आहे. सुरुवातीला खरेदी दर १२.७० रुपये प्रति किलो जाहीर केला. शेतकरी आंदोलनानंतर त्यात वाढ करून १५.८० रुपये प्रति किलो करण्यात आला. रविवारी, १३ जून रोजी त्यात वाढ करून १६.५० रुपये प्रति किलोचा नवीन दर लागू केला आहे.

नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीचे एकूण २२ निकष आहेत. कांद्याचा आकार ३५ मिलीमीटरपेक्षा जास्त असावा. उन्हाचा डाग नसावा. काळा पडलेला अथवा बुरशी न लागलेला दर्जेदार कांदा खरेदीसाठी आवश्यक आहे. हा दर्जेदार कांदा नाशिक परिसरातील बाजार समित्यांमध्ये १८ ते २५ रुपये किलो दराने विकला जात आहे. सरकारने ठरवून दिलेल्या दरात कांदा मिळत नसल्यामुळे खरेदी दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. तरीही नाफेड, एनसीसीएफला जूनअखेर दोन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्टे गाठता येईल, असे दिसत नाही.

पणन मंत्र्यांच्या घोषणांना वाटाण्याच्या अक्षता

पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी कांदा खरेदी बाजार समित्यांमधून केली जाईल. कांदा खरेदी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. बाजार समित्यांमध्ये कांद्याची दर्जानिहाय वर्गवारी (ग्रेडिंग) करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, अशा विविध घोषणा केल्या होत्या. पण, नाफेड, एनसीसीएफचे काम केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून चालत असल्यामुळे संबंधित अधिकार राज्य सरकारच्या सूचनांन जुमानत नाहीत. राज्याच्या पणन विभागाला कांदा खरेदीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे कांदा खरेदी बाबत रावळ यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी केली आहे.

यंदा कांदा खरेदीत गैरव्यवहार

नाफेड, एनसीसीएफच्या माध्यमातून ग्राहक हितासाठी कांदा खरेदी केला जातो. दर वाढताच हाच कांदा बाजारात आणून दर पाडले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड, एनसीसीएफला कांदा विकू नये. बाजार समित्यांच्या लिलावत सहभागी होऊन स्पर्धात्मक दराने कांदा खरेदी करावी. केवळ बाजार समिती गाळा घेऊन कांदा खरेदी केल्यामुळे शेतकरी हित साधले जाणार नाही. दरवर्षी प्रमाणे यंदा कांदा खरेदीत गैरव्यवहार होताना दिसत आहेत. आमच्या तक्रारींची केंद्र सरकार, राज्य सरकारने कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला.