नगर : अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेला मार्चअखेरीस पाच कोटी ५८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. लवकरच बँक सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करणार असल्याची माहिती बँकेचे संस्थापक संचालक हस्तिमल मुनोत व अध्यक्ष आनंदराम मुनोत यांनी दिली.

मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षांतील बँकेच्या कामगिरीची माहिती देताना अध्यक्ष मुनोत यांनी सांगितले,की बँकेच्या एकूण ठेवी १३४८ कोटी ६३ लाखाच्या झाल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत टाळेबंदीमुळे बँकिंग व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. त्यामुळे गतवर्षांत बँकेच्या सुमारे २२ कोटींनी ठेवी कमी झाल्या तर ३८ कोटी रुपयांनी कर्जे कमी झाली आहेत. गत वर्षांत ७९९ कोटी १ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. सभासदांना लाभांश वाटपासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे परवानगी मागण्यात आली आहे.

बँकेने कर्जदारांना व्याजामध्ये २१ कोटी ९ लाख रुपयांची भरघोस सवलत देऊनही बँकेला २५ कोटी ३ लाखांचा ढोबळ नफा झाला, सवलतीचा फायदा सुमारे ५ हजारावर कर्जदारांना झाला. गेल्या दोन आर्थिक वर्षांत करोना प्रादुर्भावामुळे सर्वच स्तरावर आर्थिक गती मंदावली होती, आता ही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बँकेची १३६ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झालेली आहे. बँकेचा निव्वळ एनपीए ७.०५ टक्के आहे, तो गतवर्षीपेक्षा कमी असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष संजय गांधी यांनी दिली.

डाळ मंडई शाखा इमारतीचे लवकरच उद्घाटन

बँकेच्या नगर शहरात ७, जिल्ह्यात जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, सोनई व जिल्ह्याबाहेर औरंगाबादमध्ये दोन, पुणे जिल्ह्यात ३ व बीड जिल्ह्यात १ अशा एकूण १८ शाखा आहेत. बँकेने डाळ मंडई शाखेसाठी स्वत:ची इमारत उभी केली असून, लवकरच तिचे ज्येष्ठ संचालक हस्तिमल मुनोत यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. ग्राहकांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक बँकिंगच्या सुविधा निर्माण केल्याकडे मुनोत यांनी लक्ष वेधले.