“भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं ” असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारपरिषदेत केलं. तसेच, त्यांनी यावेळी “अजुनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे.” असं म्हणत महाविकास आघाडीला आव्हानही दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ओबीसी आरक्षाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल लागत आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपाच्या पत्रकारपरिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “आज १०६ नगरपंचायतींचे निकाल लागत आहेत, त्यातील सात नगरपंचायतींचे निकाल उद्या लागतील. म्हणजे जवळपास ९९ नगरपंचायतींचे निकाल पूर्ण लागले आहेत, असं म्हणायला आता हरकत नाही. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की, भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे. सदस्य संख्येत देखील भाजपा क्रमांक एकवर. नगरपंचायती पूर्ण जिंकणं आणि भाजपाच्या पाठिंब्याने जिंकणे यात देखील भाजपा क्रमांक एकवर हे सिद्ध झालं आणि वारंवार आम्ही ते म्हणत आहोत, की महाराष्ट्रत वेगवेगळे लढा आणि मग कोणाची ताकद जास्त आहे ते पाहू.”

तसेच, “विचाराने, आचाराने एक नसताना देखील युती करून भाजपाशी लढत देण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्या एकत्र लढण्याला देखील नजीकच्या काळात आम्ही पुरून उरू. पण एकएकटे लढण्यात आम्ही हे सिद्ध केलं आहे, सहा जिल्हापरिषदांच्या पोटनिवडणुकांमध्येही सिद्ध केलं, ग्रामपंचायत निवडणुकीतही सिद्ध केलं, विधानपरिषद निवडणुकीतही सिद्ध केलं, पंढरपुरलाही सिद्ध केलं आणि आज नगरपंचायती व दोन जिल्हापरिषद निवडणुकातही सिद्ध केलं आहे की, भाजपाच महाराष्ट्रामधील क्रमांक एकचा प्रश्न आहे.” असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

भंडारा-गोंदिया देखील भाजपाचंच वर्चस्व राहणार –

याचबरोबर “ साधारणता २४ नगरपंचायती भाजपाच्या चिन्हावर स्पष्टपणे जिंकल्या जात आहेत आणि सहा नगरपंचायती अशा आहेत जिथे भाजपाच्या पाठिंब्यावर म्हणजे एकूण ३० ठिकाणी भाजपा स्वबळावर विजयी होत आहे. सदस्य संख्या तरी भाजपाची ४००पेक्षाही पुढे जाईल. उद्या आणखी सात नगरपालिकांचे निकाल लागतील. भंडारा-गोंदिया निवडणुकीत देखील अशीच परिस्थिती आहे की गोंदिया जिल्हापरिषद भाजपा सहज जिंकेल असं दिसतय, भंडारा जिल्हापरिषदेत थोडीफार कोणाची तर मदत घ्यावी लागू शकते पण या दोन्ही ठिकाणी देखील भाजपाचंच वर्चस्वच राहील. ” असा दावा देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

काँग्रेस आणि शिवसेनेवर साधला निशाणा –

तर, “ अशी देखील माहिती येत आहे की नाना पटोले ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसचा दारूण पराभव झालेला आहे. जिल्हापरिषदचे विद्यमान अध्यक्ष जे त्यांचे नेते आहेत ते पराभूत झालेले आहेत, अशी खूप मोठी दाणादाण झालेली आहे. नेहमीप्रमाणे या निवडणुकीत शिवसेना ही क्रमांक तीन, चारसाठी लढत देत आहे. ” अशी माहिती देत त्यांनी काँग्रेस व शिवसेनेवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagar panchayat election result bjp is once again the number one party in maharashtra chandrakant patil msr
First published on: 19-01-2022 at 14:25 IST