|| दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वजित कदम यांना धक्का; सांगलीत संमिश्र निकाल

सांगली : जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना जोरदार धक्का देत तरुणांच्या हाती सत्तेचा सुकाणू सोपवत आता तरी जमिनीवर येऊन राजकारण करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या चार दशकांपासून हाती सत्ता असूनही खुर्चीचा खेळ आता परवडणारा नाही, असाच संदेश कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाने दिला आहे. यानिमित्ताने माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा राजकीय मंचावर झालेला दणदणीत प्रवेश आणि कडेगावमध्ये राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना बसलेला पराभवाचा धक्का प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे, तसेच सत्तेशी साटेलोटे ठेवत राजकारण करणाऱ्यांनाही  मतदारांनी चपराक दिली आहे.  जिल्हृयात कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. या तीन नगरपंचायतींपैकी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष  लागून  राहिले होते. कारण स्व. आर.आर. आबांच्या नंतर पहिल्यांदाच त्यांचा मुलगा रोहित पाटील हा नेतृत्वासाठी मैदानात उतरला होता. कवठेमहांकाळचे राजकारण आतापर्यंत घोरपडे-सगरे या व्यक्तीसापेक्ष गटापुरतेच  मर्यादित राहिले आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तासगावचा भाग जोडल्यापासून येथील राजकारणात आबांचा गट, खासदार संजयकाका पाटील यांचा एक गट तयार झाला. बाजार समिती, जिल्हा बँकेच्या सत्तेत या गटाच्या बळावर राजकारण होऊ लागले.

नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे खासदार पाटील व शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली पॅनेल मैदानात उतरवले होते. जागावाटपात आबा गटाची कोंडी करून देईल त्या जागा मान्य करीत आघाडी करण्याची तयारी दर्शवली. मात्र, रोहित पाटील यांनी अवमानकारक तडजोडीला नकार देत राष्ट्रवादीच्या चिन्हावर पॅनेल मैदानात उतरवले. लोकांनीही या नवख्या नेतृत्वाला साथ देत तब्बल १० जागा देत आबा गटावर विश्वास दर्शवला. घोरपडे-सगरे-खासदार गटाला सत्तेपासून दूर ठेवत बदलत्या राजकारणाची दिशाही निश्चित केली. निवडणूक प्रचाराच्या काळात रोहित पाटील यांना वय, अनुभव यांच्या निकषावर घेरण्याचे प्रयत्न खासदार व घोरपडे यांनी केला. मात्र, आता मी केवळ २३ वर्षांचा आहे, आणखी दोन वर्षांनी कोणाचेच काही शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा देत मोर्चेबांधणी केली होती. माझा बाप काढणाऱ्या विरोधकांना  निकालादिवशी बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असेही रोहितने एका भाषणात सांगितले होते. मतदारांनी निवडणूक निकालाने ते खरे करून दाखविले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात असूनही पक्षाच्या जिल्हा नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष न घालता ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतली होती. याची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली. यामुळे कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीच्या विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्षांचेही नाही तर केवळ रोहित पाटील या नवख्या तरुणाचे आहे असेच म्हणावे लागेल.

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या  कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपने १० जागा जिंकल्या आहेत. कदम यांच्या पॅनेलला सहा जागा जिंकता आल्या. स्व. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास राज्यमंत्री कदम कमी पडत आहेत असा याचा अर्थ निघू शकतो. या ठिकाणी त्यांचे पारंपरिक विरोधक म्हणून देशमुख गटाने १० जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सख्य आगामी काळात धोक्याचे ठरू शकते, हा राज्यमंत्री कदम यांना या निवडणुकीने दिलेला इशारा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  खानापूर नगरपंचायतीमध्ये शिवसेना म्हणजेच आ. अनिल बाबर आणि राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या गटाने सत्ता जिंकली असली तरी ती  काठावरची सत्ता आहे. बाबर-कदम यांच्या आघाडीला ९ जागा, तर जनता आघाडीला आठ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही आघाडीमध्ये शिवसेनेचा एक तर काँग्रेसचा एक गट सहभागी होता. यामुळे येथील निकालाचा नेतृत्वावर फारसा  फरक पडेल असे नसले तरी आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपला  फारसे लोकांनी स्वीकारले नाही हेही दिसून आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagar panchayat election strong push bjp shiv sena nationalist akp
First published on: 20-01-2022 at 00:05 IST