अहिल्यानगर : अवसायानातील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (बहुराज्यीय) उर्वरित ठेवीदारांना, पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना, ठेव पावतीच्या ५० टक्के रक्कम येत्या जुलै महिन्यात मिळणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली. बँक अवसायानात निघाल्याने शेकडो ठेवीदारांच्या सुमारे ३५० कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी बँकेमध्ये अडकल्या आहेत. त्यापैकी ५ लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळाली आहे.

पाच लाखांपेक्षा अधिक रकमेची ठेव असलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा होती. आता या ठेवीदारांना ५० टक्के रक्कम पुढील महिन्यात मिळणार आहे. याबाबत ‘डीआयसीजीसी’कडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव बँकेने पूर्वीच सादर केला होता. त्यानुसार डीआयसीजीसी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र नुकतेच बँक प्रशासनास प्राप्त झाले. त्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त ठेव रक्कम असलेल्या व विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म व केवायसी पूर्तता केलेल्या १ हजार ९२६ ठेवीदारांना ठेव पावतीच्या ५० टक्के इतकी रक्कम जुलै महिन्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठेवी परत करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्याचे ‘आरबीआय’शी निगडित कामकाज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर या रकमा ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.