कराड : राज्यातील नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) लागू करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर उभारण्यात आलेल्या सातत्यपूर्ण लढ्याची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्यांना ‘एनपीएस’ लागू करण्याचे निर्देश दिलेत. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने आणि आग्रही पाठपुरावा केला होता. त्यांनी या समस्येचे गांभीर्य शासनदरबारी अत्यंत प्रभावीपणे मांडले होते. त्यांच्या या विशेष प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संघटनेला दोन वेळा बैठकीसाठी निमंत्रित करून सकारात्मक चर्चा केली होती. तसेच कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. शिक्षक नेते अर्जुन कोळी यांनी मागणी मान्य झाल्याचा लेखी शासन निर्णयही माध्यमांना सादर केला आहे.
प्रमुख शिलेदार
राज्यातील नगरपरिषद शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही ‘राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ लागू करण्याच्या मागणीसाठी अर्जुन कोळी यांनी राज्यव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करत सातत्यपूर्ण लढा दिला, तर आमदार डॉ. अतुल भोसले, यांनी शासन आणि प्रशासनाकडे राज्यातील नगरपरिषद शिक्षक, कर्मचाऱ्यांची मागणी लावून धरली होती.
मुख्यमंत्रीस्तरावर निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला मंजुरी देणारे धोरणात्मक निर्देश जारी केले आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नी दोन विशेष बैठकांचे आयोजन व चांगले सहकार्य केले.
निर्णयाने आनंदी- अर्जुन कोळी
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी म्हणाले की, ‘‘हा विजय संघटनेचा सातत्यपूर्ण संघर्ष, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अभेद्य एकजुट आणि शासनाच्या संवेदनशील भूमिकेचा परिपाक आहे. अनेक वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाल्याने मी व्यक्तीशः खूप आनंदी असून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.’’
