५५ फूट खोल आणि २५ फुट पाणी असलेल्या खाणीत पडून वाघाच्या मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मृतावस्थेतील वाघ बिहाडा खाणीतील पाण्यावर तरंगत असल्याचे दिसताच खळबळ उडाली.
नागपूर वनविभागाच्या रामटेक वनपरिक्षेत्राअंतर्गत मानेगाव बिट संरक्षित वनकक्ष क्र. २९३ च्या परिसरात बिहाडा खाणीत वाघाचा मृतदेह तरंगतांना वनखात्याच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिसून आले.

घटनेची माहिती वरिष्ठांना देताच रामटेक उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी व त्यांची चमू तसेच मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते घटनास्थळी पोहोचले. खडकाळ भागात ही खाण असून ती ५५ फुट खोल आहे. तर २५ फूटपर्यंत या खाणीत पाणी भरलेले होते. त्यामुळे खडकाळ भागावरुन घसरुन वाघ खाणीत पडला असावा आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा खाणीतून वाघाचे शव काढण्यात आले. रविवारी सकाळी शवविच्छेदन आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी कळवले आहे.