संत्रानगरी म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर आयपीएलच्या सहाव्या पर्वातील सट्टेबाजीने हादरले असून शहरातील ‘बिग बुकी’ छोटू अग्रवाल दिल्ली पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सट्टेबाजी वर्तुळातील छोटे बुकी गाशा गुंडाळून भूमिगत झाले आहेत. आयपीएल बुकींच्या कडीत नागपुरातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुनील भाटियाला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान त्याने काहींची नावे उघड केली असल्याने क्रिकेट सामन्यांवर सट्टय़ाच्या माध्यमातून कोटय़वधींची कमाई करणाऱ्यांची साखळी खंडित झाली आहे. यात काँग्रेसच्या बडा पदाधिकाऱ्याचा सख्ख्या भाऊ व माजी रणजीपटू मनीष गुड्डेवार हा देखील अडकला असून त्याच्याकडूनही बरीच माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. यातूनच छोटू अग्रवालच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. त्याला टेलिफोन नगर चौकात शुक्रवारी अटक करून लगेचच दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत आणि बॉलिवूडमधील विंदू दारासिंग यांच्याकडून स्पॉट फिक्सिंगचा पर्दाफाश झाल्यानंतर बुकींच्या देशभर पसरलेल्या जाळ्यांची साखळी जोडण्याचे प्रयत्न दिल्ली पोलिसांनी सुरू केले. यातूनच नागपूरचे आयपीएल स्पॉट फिक्सिंग कनेक्शन उघड झाले. अटकसत्र सुरू झाल्याने नागपूरचे बुकी वारंवार सीम कार्ड बदलवून साथीदारांच्या संपर्कात असले तरी त्यांच्या टेलिफोनिक संभाषणांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी छोटू अग्रवालच्या ठावठिकाण्याची अचूक माहिती मिळविली. छोटू अग्रवाल आणि सुनील भाटिया हे विदर्भातील बडे बुकी असून त्यांच्या अटकेमुळे सट्टेबाजीची अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी देशभरातून आतापर्यंत किमान ४० बुकींची धरपकड केली आहे. यात सुनील भाटिया आणि छोटू अग्रवाल ही दोन्ही नावे पोलिसांच्या रडारवर होती. सुनील हाती लागल्यानंतर तो फुटला आणि त्याने थेट छोटूच्या हालचालींचा गोषवराच पोलिसांना सादर केला.
दिल्ली पोलिसांचे एक पथक छोटू अग्रवालच्या मागावर नागपुरात तळ ठोकून होते. शुक्रवारी सायंकाळी त्याला अटक करून पथकाने लगेच दिल्लीकडे प्रयाण केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या दणक्यामुळे बुकींची सट्टेबाजी सध्या तरी बंद आहे. इंग्लंडमध्ये ६ जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाश्र्वभूमीवर सट्टेबाजांची टोळी पुन्हा सक्रिय होऊ नये, यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार छोटू अग्रवालने नागपूर, मुंबई, रायपूर, हैदराबाद येथे कोटय़वधींची माया जमविलेली असून पोलिसांच्या हाती लागलेला तो सर्वात ‘श्रीमंत’ बुकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर शहर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने बुकींचे ‘अंडरग्राऊंड’ साम्राज्य येथूनच चालते. यात छोटू अग्रवाल, किरण ढोले, सुनील भाटिया प्रमुख भूमिका बजावत होते. रणजीपटू मनीष गुड्डेवारही त्यांना मदत करत होता.
क्रिकेटवरील सट्टेबाजीचे सौदे कोटय़वधींमध्ये असून यातून झालेल्या व्यवहारांची आकडेवारी डोके चक्रावणारी आहे. तरीही आयकर खात्याचे या आकडेवारीकडे लक्ष कसे गेले नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागपुरातील आठ बुकी रडारवर असून त्यांची संपत्ती किमान १० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. आयकर सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीर संपत्ती बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईची जबाबदारी पोलीस खात्याची आहे. बिल्डर, व्यावसायिक आणि बॉलिवूडच्या कलाकारांवर आयकर धाडी टाकणारे आयकर खाते बुकींच्या अमाप संपत्तीची माहिती असूनही मौन का बाळगून आहेत, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.