Congress Criticism on CM Devendra Fadnavis: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवत जागा राखल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तब्बल ४० तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला. या निकालानंतर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याची खिल्ली उडवणारी सोशल मीडिया पोस्ट फडणवीस यांना डिलीट करावी लागली. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा ३,२७१ मतांनी पराभव केला. वंजारी यांना ६७,२३१ मते मिळाली, तर कोहळे यांच्या पारड्यात ६३,९६० मते पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या दोघांनीही कोहळे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता.

पोस्ट हटवण्यावरून काँग्रेसचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानपरिषद निवडणुकांवरून काँग्रेसला लक्ष्य करणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्याला दुजोरा देत फडणवीस यांनीही काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. मात्र नागपूरचा अंतिम निकाल हाती येताच फडणवीस यांनी ती पोस्ट डिलीट केली.

फडणवीसांनी सावरकरांचा वारसा जपला

यावरून महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वरील पोस्टमधून टीका केली. “पोस्ट डिलीट करून फडणवीसांनी पुन्हा एकदा सावरकरांचा वारसा जपला आहे. संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात फडणवीसांनी पोस्ट केली होती. पण तोच बाण उलटा फिरून त्यांच्याच छातीत घुसला! अखेर त्यांना पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली.”

काँग्रेसने पुढे म्हटले, “फडणवीसजी, एवढ्यातच घाबरलात? हा तर फक्त ट्रेलर आहे! २०२९ मध्ये महाराष्ट्रातील जनता तुमचा असा राजकीय कंडका पाडेल की, आजची ही पोस्टही तुम्हाला आठवेल. ऑल द बेस्ट, फडणवीसजी! पुढच्या झटक्यासाठी तयार राहा.”

बॅलेट पेपरवरील मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवरही पलटवार

दरम्यान देशातील चार राज्यांच्या विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांवरून काँग्रेसवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांतील २८ जागांवर मतपत्रिकेद्वारे निवडणुका झाल्या असूनही काँग्रेसने किती जागा जिंकल्या? असा सवाल मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये उपस्थित केला होता.

याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते व खासदार पवन खेरा यांनी पंतप्रधानांना थेट आव्हान दिले. “ईव्हीएममुळे निवडणूक निकालांवर कोणताही फरक पडत नाही, असा जर नरेंद्र मोदींना ठाम विश्वास असेल, तर त्यांनी केवळ शब्दांचे फुलोरे न दाखवता कृतीतून भाजपाचे निवडणूक सामर्थ्य सिद्ध करावे आणि आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाव्यात,” असे खेरा म्हणाले.

याशिवाय मतदार याद्यांच्या एसआयआर कार्यक्रमाला स्थगिती द्यावी, अवैध पद्धतीने वगळण्यात आलेली १३.३ कोटी मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे.