राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातल्या एकूण ६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. आज दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे. यामध्ये कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबईतल्या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. पण नागपूरमध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी दिली गेल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकांवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न दिल्यामुळे भाजपामध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने त्यांचं पुनर्वसन केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नागपूर विधानपरिषद निवडणूक चर्चेत आली आहे. मात्र, इतर चार जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे या ठिकाणीही बिनविरोध निवडणूक होणार का आणि झाली तर कोण माघार घेणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

दरम्यान, आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर नागपूर विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये थेट सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे.

“कोल्हापूर आणि नंदुरबार-धुळे या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. नंदुरबार-धुळे भाजपाला तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला आली आहे. मुंबईत एक शिवसेना आणि एक भाजपा अशा बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. पण नागपूरमध्ये लढत होईल”, असं नाना पटोले म्हणाले.

नागपूरमध्ये बिनविरोध का नाही?

दरम्यान, इतर ठिकाणी बिनविरोध निवडणूक होत असताना नागपूरमध्येच निवडणूक का होत आहे? अशी विचारणा केली असता नाना पटोलेंनी चेंडू भाजपाकडे टोलवला आहे. “अर्ज परत घेण्याची मुदत संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयरच विजयी होतील. नागपूरसाठीचा कोणताही प्रस्ताव भाजपाकडून आला नाही. त्यामुळे नागपूरचा निर्णय झालेला नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अमल महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष”

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी “राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार आहे”, अशी भविष्यवाणी केली आहे. याविषयी विचारणा केली असता नाना पटोलेंनी राणेंचं नाव न घेता भाजपावर टोला लगावला आहे. “भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची भविष्यवाणी खोटी ठरू लागली आहे. त्यावर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही. राज्यातलं सरकार ५ वर्ष चालेल”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.