चितळाचे शिकारी वनखात्याच्या ताब्यात
वार्ताहर, गोंदिया
तिरोडा वनविभागांतर्गत ग्राम मंगेझरी परिसरात २० मार्चला एका चितळाची वीजप्रवाह लावून शिकार केल्याचे उघडकीस आले होते. परंतु शोध घेऊनही यातील आरोपींना अटक करण्यात वन कर्मचाऱ्यांना यश मिळत नव्हते. आरोपींच्या अटकेसाठी तिरोडा वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून २६ एप्रिलला आरोपींना नागपूर जिल्ह्यातून अटक केली.
मंगेझरी परिसरात २० मार्चला एका चितळाची शिकार झाल्याची माहिती मिळताच तिरोडा वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता वीजप्रवाह लावून या चितळाची शिकार केली असल्याचे उघड झाले.
शिकारी न सापडल्याने या कर्मचाऱ्यांच्या दोन चमूने सतत मागोवा घेतला. दरम्यान, काल मध्यप्रदेशातील खैरी येथील आरोपी घनश्याम महादेव सोनवाने (२२), वसंत मोतीराम वरखडे (२४) व चंद्रकुमार इशुलाल कुंभरे (३०, सर्व रा.मंगेझरी) यांना नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील घोनाळ येथून शिताफीने अटक केली आहे.

स्थायी समिती सभापतीपदी संतोष लहामगे बिनविरोध
प्रतिनिधी, चंद्रपूर<br />चंद्रपूर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेस लोकशाही आघाडीचे संतोष लहामगे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे मनपात पुन्हा तिवारी-लहामगे-अमृतकर गटाने निर्विवाद यश संपादन केले आहे.
चंद्रपूर महापालिका स्थायी समितीचे सभापती रितेश उर्फ रामू तिवारी यांचा कार्यकाळ ३० एप्रिलला संपत असल्याने या पदासाठी आज, २८ एप्रिलला निवडणूक घेण्यात आली. यासाठी काँग्रेस लोकशाही आघाडीकडून काँग्रेसचे गट नेते संतोष लहामगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी त्यांना विजयी घोषित केले.
विशेष म्हणजे, स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असून काँग्रेस लोकशाही आघाडीचे ९ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे ४, शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विद्यमान सभापती तिवारी यांनी लहामगे यांच्यासाठी जागा मोकळी करून दिल्याने व मनपात विरोधक शिल्लक नसल्याने सभापती पदासाठीची ही निवडणूक अविरोध झाली. लहामगे गेल्या १५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. या काळात त्यांनी नगरपालिका उपाध्यक्षापासून तर विविध विषय समितीचे सभापतीपद भूषविले आहे.
लहामगे यांच्या विजयाने काँग्रेसच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे. लहामगे यांची निवड होताच गुलाल उधळून, फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लहामगे यांच्या निवडीचे महापौर राखी कंचर्लावार, सभापती रामू तिवारी, संगीता अमृतकर, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादीचे गटनेते संजय वैद्य यांनी अभिनंदन केले.

आठवडी बाजारातील आगीत ५ दुकानांची राख
गडचिरोली : कुरखेडा येथील आठवडी बाजारात लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाली. यात जिवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले. रविवारी रात्री लागलेल्या या आगीत खुशाल नंदेश्वर यांच्या टेलरिंग शॉपमधील शिवणयंत्रे व कपडे जळाले. सोमनाथ कोटेरी यांचे दुकान जळाल्याने मोठे नुकसान झाले. सदाशिव कुमरे यांच्या संगीत दुकानातील वाद्य जळाली. वसंत राऊत, सावन बैसाकु यांचेही दुकान जळाले.