उपराजधानीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची टेहळणी करणाऱ्या एका दहशतवाद्याला नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. रईस शेख असे आरोपीचे नाव असून त्याने गेल्या १५ जुलै २०२१ ला नागपुरात घातपात करण्याच्या उद्देशाने टेहळणी केली असल्याचं समोर आलं आहे.

जानेवारी महिन्यात रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्याने काश्मिर पोलिसांकडे नागपुरातील संघ मुख्यालयात टेहळणी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर नागपूर पोलीस दलाचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी काश्मीरला जाऊन रईसची चौकशी केली होती, हे विशेष. त्यानंतर नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरला जाऊन त्याला ताब्यात घेतले. दहशतवादी रईस शेखची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

नेमकं घडलं काय?

पाकव्याप्त काश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याच्या सांगण्यावरून रईस शेख जुलैमध्ये नागपुरात आला होता. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारतीची त्याने पाहणी केली आणि तो काश्मिरला परतला. सप्टेंबर २०२१मध्ये रईसला काश्मिर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बुक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची टेहळणी केली होती. या ठिकाणांचं दुरूनच छायाचित्रण करून त्याने ते पाकिस्तानमधील म्होरक्याला पाठवले होते. आता नागपूर एटीएस या घटनेचा तपास करणार असून त्याच्याकडून त्या टेहळणीची रंगीत तालीम करून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.