मागील ३० वर्षात नक्षलवाद्यांनी ५ हजारापेक्षा जास्त आदिवासींची निर्घृण हत्या केली आहे. याउलट अवघ्या ३ वर्षात पोलिसांनी ३ हजारांपेक्षा अधिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तेव्हा नक्षलवाद्यांचा निषेध करा व सी-६० जवानांचे अभिनंदन करा असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय, नागपूर येथे कार्यरत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नक्षलवादी चळवळ ही दहशतीवर आधारीत आहे. सत्ता ही बंदुकीच्या नळीतून हस्तगत होते. या माओंच्या तत्वावरच माओवाद्यांची कार्यनिती अवलंबून आहे. आदिवासी लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वावर आधारीत आहे. परंतु नक्षलवाद्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले भारतीय संविधान मान्य नाही. भारतीय संविधानाच्या आधारेच स्थानिक आदिवासी जनतेला ग्रामसभा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी पेसा ( PESA ) कायदा राबविण्यात येत आहे.

ग्रामसभेकडून नक्षलवादी हे जबरदस्तीने खंडणी वसूल करतात. गेल्या ३० वर्षात नक्षलवाद्यांनी ५ हजारापेक्षा अधिक आदिवासींची निर्घृण हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी मंगेझरी, मुरमुरी व जांभुळखेडा अशा विविध ठिकाणी घडवून आणलेल्या भुसूरूंग स्फोटामध्ये पोलीस जवान शहीद झाले आहेत. तेव्हा कुठे गेला होता मानवाधिकार. नक्षलवाद्यांच्या दहशतीपासून गेल्या ३० वर्षापासून सी ६० चे जवान आदिवासी जनतेचे संरक्षण करीत आहेत. त्यामुळे नक्षलवादी सी ६० जवानांनी केलेल्या कार्यावाहीने घाबरून गेले आहेत. त्यातूनच ते सी ६० जवानांच्या बाबतीत अपप्रचार करणारे पत्रक प्रसारीत करीत आहेत. ज्यामध्ये कसलेही तथ्य नाही.

लोकशाहीत प्रसार माध्यमांना स्वातंत्र आहे. परंतु माओवादी यंत्रणेमध्ये प्रसार माध्यमांना स्थान नाही. तेव्हा माध्यमांनी नक्षलवाद्यांच्या अपप्रचार करणाऱ्या पत्रकाची दखल घेवू नये असेही आवाहन केले आहे. पोलिसांनी ३ वर्षात ३ हजार आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आदिवासींसाठी केलेल्या या कार्याची दखल घेवून सी ६० जवानांचे अभिनंदन करावे असेही आवाहन डॉ.रोहन यांनी केले आहे